Loksabha election : शरद पवारांनी शेताच्या बांधातच राहावे, शेजारचा बांध रेटू नये – भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील मंदिरात बाल रामचंद्राची मूर्ती आहे. याची माहिती न घेताच प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही याची चौकशी नास्तिक म्हणवणार्‍या पवार साहेबांनी करू नये. त्यांनी आपल्या शेताच्या बांधातच बोलावे, देव, धर्म, देऊळ या त्यांच्या प्रांतात नसलेल्या बांधात घुसखोरी करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी शुक्रवारी (दि.19) लगावला.
     

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का नाही, असा सवाल अलीकडेच उपस्थित केला आहे त्यासंदर्भात माधव भंडारी बोलत होते.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे विधान करण्यापूर्वी प्राथमिक माहिती घेतली असती तरी बरे झाले असते. कुटुंबातील सुनेला बाहेरची म्हणून आपला स्त्री शक्तीबद्दलचा खरा दृष्टिकोन दाखवणार्‍या साहेबांनी ऊसाचा उतारा, द्राक्षाची छाटणी, डाळींब लागवड यासारख्या त्यांच्या अभ्यासाच्या  विषयांवर हवे तितके बोलावे. मात्र देव-धर्म, संस्कृती विषय त्यांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही. अभ्यास नसलेल्या अशा विषयांबद्दल बोलून पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने  आपल्या ‘मती’चे दिव्यदर्शन घडवू नये.

 

 

आदरणीय पवार साहेबांच्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाबद्दल सर्वांनाच आदर आहे. त्यांनी आपल्या संबंधित क्षेत्राबाबत मत प्रदर्शन केले तर कोणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र ते स्वत:ला नास्तिक म्हणवतात. त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही, याची काळजी त्यांनी करू नये. शरद पवार साहेबांना बोलण्यासाठी विषय हवा असला तर बारामती (Loksabha election) तालुक्यातील जिरायती भागाला का पाणी मिळू शकले नाही, यासारखा चांगला विषय नाही. सध्या ते बारामतीतच अडकून पडल्याने त्यांना आपल्या तालुक्यातील जिरायती भागाला का पाणी मिळू शकले नाही, याबाबतचा शोध निबंध तयार करता येईल असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.