Pune : मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्षभर बाकी असताना पुण्यातील लोकसभेची जागा कॉंग्रेसकडून कोण लढवणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील काही इच्छुकांबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असून त्यांच्याकडून तशी चाचपणीदेखील करण्यात येत असल्याच्या बातम्या येत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या बातम्यांच खंडन करत मी दक्षिण कराड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. 

गेल्या निवडणुकीत विश्‍वजीत कदम यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे पुरते पानिपत झाले. गेल्या पन्नास वर्षात प्रथमच पुण्यात कॉंग्रेसची अशी दयनीय अवस्था आहे. संघटनेच्या पातळीवर तर यापेक्षा भीषण परिस्थिती आहे. पूर्वीपेक्षा अधिक गटतटात कॉंग्रेस दुभंगलेली आहे. लोकसभेसाठी अनेक इच्छुक तयार आहेत. आमदार अनंत गाडगीळ यांच्यापासून अनेकांचा यात समावेश आहे. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस मधील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.