Lonaval : नगरपरिषद कर्मचारी- अधिकारी यांना दिवाळीला मिळणार 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला दिवाळीला 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा विषय सभागृहात सर्वांनुमते विनाचर्चा मंजूर करण्यात आला. लोणावळा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, शिवाजी मेमाणे, विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी, भाजपाचे गटनेते देविदास कडू,काॅग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका हे उपस्थित होते.

प्रश्न उत्तराच्या तासात विरोधक व सत्ताधारी यांनी शहरात वैद्यकिय सेवेकरिता शासकिय रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्याची तसेच वाहतूककोंडी सोडविण्याकरिता वाहनतळ सुरु करण्याची मागणी केली.

लोणावळा परिसरातील जैव वैविधतेचे जतन करण्याकरिता नव्याने समिती स्थापन करत त्यामध्ये मुख्याधिकारी यांनी सचिव तर नगराध्यक्षांसह सर्व पक्षीय निवडक लोकप्रतिनिधिंना सदस्यपदी निवडण्यात आले आहे. यासह शहर विकासाचे सुमारे 53 विषयावर साधक बाधक चर्चा करत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

शासकिय रुग्णालयाच्या प्रश्नावर उत्तर देताना नगराध्यक्षा व मुख्याधिकारी म्हणाले लोणावळा नगरपरिषदेचे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. शासनाने याठिकाणी शंभर खाटाचे रुग्णालय मंजूर केले असून त्याचे नकाशे देखील प्रसिध्द केले आहेत. पण, कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने किमान ओपीडी तात्काळ सुरु करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

वास्तविक लोणावळा हे मुंबई पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी ट्रामा केअर सेंटर देखिल सुरु होणे गरजेचे असल्याचे मत मुख्याधिकारी सचिन पवार यांनी व्यक्त केले. नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्याकरिता शासनाकडे राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करु.

सभा सुरु होण्यापुर्वी खास विषयांन्वे माजी मंत्री सुषमा स्वराज, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित, कोल्हापुर व सांगलीत निर्माण झालेल्या पुरस्थितीमध्ये तसेच लोणावळ्यातील दोन ठिकाणी घरे पडून झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली तर जखमींविषयी सहानुभिती व्यक्त करण्यात आली.

सांगली व कोल्हापुरकरांना मदत म्हणून नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षकांनी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीसाठी दिला असून सर्व नगरसेवकांनी त्यांचे सर्व शिल्लक सभा भत्ते मदतनिधीला देण्यात यावे असे सभागृहात सांगितले.

भांगरवाडी उड्डाणपुलाकरिता 9.50 कोटी अनुदान
नगरपरिषदांच्या वैशिष्ट्यपुर्ण कामांकरिता विशेष अनुदान योजनेमधून भांगरवाडी येथिल रेल्वे उड्डाणपुलाचे कामाकरिता 9.5 कोटी रुपये व पोलीस प्रशिक्षण केंद्रालगत बगीचा विकसित करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजुर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी याबाबत लोणावळा नगरपरिषदेला पत्राद्वारे कळविले आहे. ही दोन्ही कामे लोणावळा शहराकरिता महत्वपुर्ण असून ती कामे पुर्ण करण्याकरिता नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह सदस्यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, राज्यमंत्री बाळा भेगडे व वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.