Lonavala : वरसोली टोलनाक्यावरील वाहतुक कोंडीने स्थानिक नागरिक त्रस्त

टोलनाका हटावची मागणी

 

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर असलेल्या वरसोली टोलनाक्यावरील दैनंदिन वाहतुक कोंडीने स्थानिक नागरिक हैराण झाले अाहेत. टोलनाक्यावरील वाहतुक कोंडी कमी करत येत नसेल तर सदरचा टोलनाका टाकवे गावाच्या पुढे हालवावा अशी मागणी वरसोली, वाकसई चाळ, वाकसई, देवघर, सदापुर, कार्ला, वेहेरगाव, शिलाटणे, टाकवे गावातील ग्रामस्तांनी केली आहे. आज तर गोल्डन हार्वस व एक्सप्रेस वेवरील अपघातामुळे सुमारे चार तास टोलनाका परिसरात तिन ते चार किमी अंतरापर्यत वाहतुक कोंडी झाली होती. याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुलांना झाला.

वरसोली टोलनाका उभारणीपासूनच हा टोलनाका टाकवे गावाच्या पुढे हालवावा अशी स्थानिक नागरिकांची तशीच तमाम एकविरा भाविक भक्तांची मागणी होती. याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना देखिल निवेदन देण्यात आले आहे. वरसोली टोलनाक्यावरील नियोजनाच्या अभावामुळे सकाळ संध्याकाळ तसेच दिवसा देखिल अनेक वेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. सकाळच्या सुमारास लोणावळा शहरात शिक्षणाकरिता जाणारी शाळकरी मुलं तसेच दुग्ध व्यावसायीक, कामगारवर्ग यांना दैनंदिन या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. तासंनतास वाहतुक कोंडी होत असताना वरसोली टोलनाक्यावर मात्र नियमांना बगल देत वाहन चालकांकडून टोलवसुली करत वाहतुक कोंडीत भर घातली जात आहे. अनेक वेळा टोलनाक्यावरील लेन कर्मचार्‍यांच्या अभावी बंद ठेवली जाते. सकाळच्या सुमारास होणारी वाहतुक कोंडी नागरिकांकरिता मोठी समस्या बनली आहे. या कोंडीतून मार्ग काढत शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचविण्याकरिता स्कूलबस रस्त्याच्या कडेने अथवा विरुध्द दिशेने जातात यामुळे काही अपघात घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत टोलनाक्यावरील वाहतुक कोंडीची समस्या तात्काळ न सुटल्यास याठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

साईट पट्टयावर चिखलच चिखल
वरसोली टोलनाक्यावर दैनंदिन वाहतुक कोंडी होत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालक पुढे जाण्याकरिता साईड पट्टयाने वाहने घेऊन जात असल्याने साईड पट्टयावर अक्षरशः चिखलच चिखल झाला असून पादचारी व सायकलस्वार यांना याठिकाणाहून चालणे देखिल मुश्किल होत आहे. दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या साईड पट्टयांचा अक्षरशः गाळ झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.