Lonavala : शहरातून परराज्यातील मजूरांना घेऊन 16 बस रवाना

नांदेड व उस्मानाबादसाठी दोन बस

एमपीसीन्यूज : लाॅकडाऊनमुळे काम बंद झाल्याने लोणावळा शहरात व आजुबाजुच्या ग्रामीण परिसरात अडकून पडलेल्या मजूरांना घेऊन तिन दिवसात 16 बस रवाना झाल्या आहेत. यापैकी 14 शासकिय बस मध्यप्रदेशला, एक खाजगी बस तेलंगणा, एक खाजगी बस नांदेड व एक खाजगी बस उस्मानाबादला रवाना करण्यात आली.

शासकिय बसेस तहसिलदार मधुसुदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी ज्ञानेश्वर कारेकर यांनी उपलब्ध करून घेतल्या होत्या, तर नगरपरिषद संक्रमण शिबिरातील नागरिकांना मुख्याधिकारी सचिन पवार यांनी स्वंयसेवी संस्था व व्यक्ती यांच्या माध्यमातून खाजगी बसेसने रवाना केले.

साठ दिवस हाताला काम नसल्याने परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील मजूर लोणावळा शहरात व परिसरात आडकून पडले होते. या सर्व नागरिकांनी विविध सामाजिक संस्था व संघटना यांनी लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस प्रशासन, तहसिल कार्यालय, लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण तसेच कोरडा शिधा वाटप केला होता.

लाॅकडाऊन संपत नसल्याने या सर्व नागरिकांचा धीर सुटू लागला होता. ‘काहीही करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या’, अशी विनवणी हे मजूर करत होते. मात्र, शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांना कोठेही जाता येत नव्हते, तिसर्‍या लाॅकडाऊन मध्ये शिथिलता देत या मजुरांना गावाकडे जाण्याची मुबा दिल्यानंतर शासकिय यंत्रणांनी या मजुरांची आरोग्य तपासणी करत त्यांना आरोग्य प्रमाणपत्र देत त्यांची यादी तयार केली.

यानुसार एकाच भागात जाणारे 21 जण एका बसमध्ये असे नियोजन करत बसेस रवाना करण्यात आल्या. लोणावळा शहर, कुसगाव व वाकसई भागातून ही वाहने मजुरांना घेऊन गेली असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार व लोणावळा मंडल अधिकारी ज्ञानेश्वर कारेकर यांनी दिली.

आजुनही बरेच मजूर गावाकडे जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत, काही जणांनी पायीच गावाचा रस्ता धरला आहे तर काहीजण खाजगी वाहने करून गावाला निघाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.