Lonavala: शहरातील 19 अंतर्गत रस्ते बंद, 125 जणांवर कारवाई; 87 वाहने जप्त; 28 जणांना दंड

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊन व संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी लोणावळा शहरातील 19 अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले असून मुख्य रस्त्यावर कुमार चौक व भांगरवाडी इंद्रायणी पूल या दोन ठिकाणी तसेच मुंबई बँगलोर हायवेवर खंडाळा राजमाची गार्डन येथे चेकपोस्ट व नाकाबंदी करण्यात आली आहे.

 संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी आतापर्यत 125 जणांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करत त्यांची 87 वाहने जप्त केली आहेत. यापैकी 28 जणांना वडगाव न्यायालयाने 19 हजार शंभर रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

कोरोना आजाराचा फैलाव रोखण्याकरिता शासनस्तरावरून कडक उपाययोजना व संचारबंदीचे पालन करण्यात येत आहे. लोणावळा शहरात आजपर्यत कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. यापुढे देखिल शहरातील वातावरण निरोगी रहावे याकरिता लोणावळा शहरात येणारा मुख्य मार्ग वगळता इतर सर्व लहान मार्ग बंद करण्यात आले आहे. लाॅकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन करून फिरणार्‍या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत. भाजीपाला, किराणा, चिकन, मटण, बेकरी ही दुकाने सकाळी 8 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये सुरू राहतील तर मेडिकल दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान सुरु राहणार आहेत. लोणावळा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सर्व व्यावसायकांची बैठक घेऊन दुकानांना वेळापत्रक ठरवून दिले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

8 अधिकारी 130 पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर

लोणावळा शहरात लाॅकडाऊन व संचारबंदीचे पालन करण्याकरिता 8 अधिकारी व 130 कर्मचारी असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यामध्ये पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी, मुख्यालयातील स्ट्रायकींग फोर्स, एसआरपीएफची तुकडी, सीआयडीचे पथक, रेल्वे कर्मचारी, होमगार्ड, वाॅर्डन यांचा समावेश आहे.

खालील रस्ते राहणार बंद

भांगरवाडी रेल्वे गेट जवळील मारुतीमंदिर, इंद्रायणीनगर वस्तीवरील मेन रोड, रेल्वे यार्ड काॅक्रीट इंडिया हद्द, भोंडे शाळेसमोरील हनुमान टेकडी रस्ता, हनुमान टेकडी ते कैलासनगर रोडवरील नवीन पूल, इंद्रायणी पूल भांगरवाडी, नौसेनाबाग समोरील पूल, खोंडगेवाडी फाटा, नारायणधामचे पुढे पांगोळीकडे जाणारा रस्ता, लालटाकीकडून येणारा रस्ता, कुमार चौक, अपोलो गॅरेज रेल्वे गेट रस्ता, मिनू गॅरेज कडून इंदिरानगरकडे जाणारा रस्ता, पेट्रोल पंपाजवळून तुंगार्लीकडे जाणारा रस्ता, हरी इंटरनॅशनल जवळील अंतर्गत रस्ता, मनशक्ती केंद्राकडून वलवण गावात येणारा रस्ता, रायवूडच्या बाजूने जुना खंडाळा रस्ता, फरियाजकडे जाणारा रस्ता, अंबरवाडीकडे जाणारा रस्ता हे बंद करण्यात आले आहे. इंद्रायणी पूल भांगरवाडी, कुमार चौक, कृष्णाई चौक व राजमाची गार्डन समोरील पोलीस चौकी येथे चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.