BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : 24 तासात 210 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात मागील 24 तासात तब्बल 210 मिमी (8.27 इंच) पावसाची नोंद झाली आहे. यामुळे लोणावळा धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहण्याचा धोका निर्माण झाला असून वलवण धरणातून 100 ते 200 क्युसेक्स या नियंत्रित प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. लोणावळा शहरात आज अखेरपर्यत यंदाच्या मोसमामध्ये 5597 मिमी (220.35 इंच) पावसाची नोंद झाली आहे.

मागील चार दिवसांपासून लोणावळ्यात पावसाची संततधार सुरु आहे. काल, मंगळवारी रात्री मात्र परिसरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर सुरु असलेल्या संततधार पावसाचा जोर रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान वाढला. पहाटे 6 वाजेपर्यत जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी नाले तुंडून भरुन वाहु लागले असून धबधबे देखील पुन्हा वाहू लागले आहेत.

पावसाचा जोर वाढल्यास लोणावळा धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहण्याची शक्यता असल्याने नदीलगतच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा टाटा धरण प्रमुख बसवराज मुन्नोळ यांनी दिला आहे. तशा आशयांची सूचना पत्रे देखील मावळ तहसील व लोणावळा नगरपरिषदेला पाठविण्यात आली आहेत. मागील दोन महिने झालेल्या जोरदार पावसाने लोणावळा व मावळ परिसरातील सर्व धरणे तुंडूब भरलेली आहेत. पावसाचा जोर वाढल्यास मावळ व लोणावळा परिसरात पुराचा धोका संभावू शकतो.

HB_POST_END_FTR-A2

.