Lonavala: उलटलेल्या टेम्पोखाली चिरडून लघुशंकेसाठी थांबलेले पाच दुचाकीस्वार मृत्युमुखी

सहलीवरून परतताना काळाने घातला घाला

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेले पाच दुचाकीस्वार उलटलेल्या टेम्पोखाली चिरडून मृत्युमुखी पडले. बोरघाटात खंडाळा येथे अंडा पॉईंटजवळ रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातातील मृत हे तळेगाव दाभाडे येथील एका कंपनीतील कामगार होते. ते अलिबागला सहलीला जाऊन परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

खंडाळा येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन एक्सप्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉईंट येथे तीव्र व धोकादायक वळणावर पुण्याहून मुंबईकडे पिठाची पोती घेऊन जाणारा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात पुण्याच्या दिशेने येणारे तीन दुचाकीवरील सहा दुचाकीस्वार लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असता भरधाव टेम्पो त्यांच्या अंगावर पलटला या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एक जण सुदैवाने बचावला आहे.

 

सर्व दुचाकीस्वार पर्यटनासाठी अलिबाग येथे गेले होते तेथून पुन्हा (तळेगाव) पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून खंडाळा महामार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहे.

 

अपघातामध्ये  प्रदीप प्रकाश चोळे (वय 38), अमोल बालाजी चिलमे (वय 29), नारायण राम गुंडाळे (वय 27),  निवृत्ती राम गुंडाळे (वय 30), गोविंद नलवाड (वय 35) हे पाच जण मयत झाले असून  बालाजी हरिश्चंद्र भंडारी (वय 35) हे सुखरुप बचावले आहेत. वरील सर्व जण हे लातूरचे असून तळेगावात कामाकरिता रहात होते.

 

याप्रकरणी खोपोली पोलीस व बोरघाट पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.