Lonavala : लोणावळ्यात 48 तासात 633 मिमी पाऊस; इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ

एमपीसी न्यूज – लोणावळ्यात दोन दिवस जोरदार कोसळल्यानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. शुक्रवार ते रविवार ह्या 48 तासांत लोणावळा शहरात तब्बल 633 मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दुपारपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने लोणावळा शहर व ग्रामीण परिसर जलमय झाला होता. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुराचे पाणी कार्ला, मळवली, बोरज भागातील सोसायट्यांमध्ये घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मळवली येथील संपर्क संस्थेत पाणी शिरले होते तर देवले येथील ओशो आश्रमात पाण्यात आडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांना लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग या रेस्कू पथकाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप बाहेर काढले.

  • तर, भुशी धरणाच्या पायर्‍यांवरुन वेगाने पाणी वाहत असल्याने शनिवारी दिवसभर धरणावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. लोणावळा ते आयएनएस शिवाजीकडे जाणारा रस्ता क‍ाही ठिकाणी प‍ाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीकरिता बंद ठेवला होता. शहरातील वलवण गावातून जाणारा रस्ता, बापदेव रोड, नांगरगाव रोड, कुसगाव पवनानगर रस्ता, कार्ला लेणीकडे जाणारा रस्ता, मळवलीकडे जाणारा रस्ता, रायवुड येथील रस्ता, नारायणीधाम कडे जाणारा मार्ग हे बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्याने लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

नाले सफाई योग्य प्रकारे न झाल्याने तसेच पाण्याचे प्रवाह काही ठिकाणी आडविले गेल्याने नांगरगाव भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर ओसरल्याने आता लोणावळ्यातील विस्कळीत झालेले जनजीवन पुर्वपदावर येऊ लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.