Lonavala : शासन आदेश झुगारून लोणावळ्यात आलेल्या चौघांवर  गुन्हा दाखल

पुण्यातील मार्केटयार्ड भागातून आलेल्या चार जणांना स्थानिकांनी पकडले

एमपीसी न्यूज : पुण्यातील मार्केटयार्ड या रेडझोन असलेल्या भागातून लोणावळ्यात आलेल्या चार जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 188,269,270 सह साथीरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमीत दिलीप गायकवाड (वय 35 रा. श्रीराम काँलनी, तपोधाम वारजे, पुणे), निलेश शंकर राजगिरे (वय 39, रा. चैत्रबन सोसायटी, बिबवेवाडी, पुणे), सुरेंद्र नरेंद्र ठक्कर (वय 46 रा. कोंढवा बु. साई नगर, बिबवेवाडी, पुणे), अमीत विष्णु गुप्ता (वय 38 रा. ऋतुराज सोसायटी, प्रेमनगर, मोरया बंगला, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी कोरोना ( कोवीड 19 ) या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवनाश्यक सेवा पुरविणारे वगळता अन्य व्यक्तींना पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेश बंदीचा आदेश लागू केला आहे. तरीही चार जण मोटारीतून (MH 12 NJ9743) व (MH 12 NJ9743) पुणे मार्केट यार्ड या रेडझोन परिसरातून लोणावळा शहरात आले.

त्यांना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जिल्हाधिकारी यांनी कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्यासाठी पारीत केलेल्या आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लघंन केल्याप्रकरणी या चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

वलवण येथिल स्थानिक नागरिक रमेश पाळेकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, बाळासाहेब जाधव यांनी माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस व नगरपरिषद कर्मचारी यांच्या समवेत घटनास्थळावर जाऊन संबंधितांना ताब्यात घेतले. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस हवालदार जयराज पाटणकर तपास करत आहेत.

लोणावळा शहर हे कोरोनामुक्त असल्याने अनेक जण लोणावळ्यात येण्याचा प्रयत्न करत आहेत. विनापरवाना कोणी शहरात आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई मोहिम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.