Lonavala: डोंगरावरून निखळलेला मोठा दगड पाटण गावात आला; पाइपलाइनमुळे विघ्न टळले

Lonavala: A large rock came out of the mountain and came to Patan village; The pipeline avoided disruption अन्यथा गावातील काही घरांचे मोठे नुकसान सोबत जिवीतहानी देखील झाली असती.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील पाटण गावावर दगड रुपाने काळ बनून आलेले विघ्न पाइपलाइनमुळे टळले.

ही घटना आहे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी व डोंगर कपारीत वसलेल्या पाटण गावातील. शनिवारच्या (दि.18) काळरात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोंगरावरून एक भला मोठा दगड घरंगळत पाटण गावातील घरांच्या दिशेने आला. पाऊस सुरू असल्याने ग्रामस्थ त्यांच्या घरात होते. दगड रुपाने आलेल्या काळाची कोणाला जाणीव देखील नव्हती.

सुदैवाने गावाच्या वरील बाजूने असलेल्या पाण्याच्या पाइपलाइनला हा दगड अडकला व तेथेच थांबला, यामुळे गावावरील मोठे विघ्न टळले. अन्यथा गावातील काही घरांचे मोठे नुकसान सोबत जिवीतहानी देखील झाली असती.

जोरात आवाज झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. सकाळी डोंगरातून दगड खाली आल्याची माहिती ग्रामस्थांनी कार्ला विभागाचे मंडल अधिकारी माणिक साबळे यांना दिली.

साबळे यांच्यासमवेत तलाठी मिरा बोर्‍हाडे, सरपंच रूपाली मंगेश पटेकर, पोलीस पाटील रुपाली धनेश पटेकर, संदीप तिकोने, सुभाष साठे, श्रीकांत घाडगे, परशुराम येवले, संतोष तिकोने यांनी या ठिकाणाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

मावळ तालुक्यातील पाटण हे गाव विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगरकुशीत वसले असून गावच्या तीनही बाजूने मोठे डोंगरकडे आहेत. पावसाळ्यात येथून अनेक फेसाळणारे धबधबे वाहत असतात. पावसाळ्यात हे मन मोहून टाकणारे निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

पण आता हे निसर्ग सौंदर्यच येथील नागरिकांच्या भीतीचे कारण बनू पाहत आहे. या डोंगरकड्याला काही ठिकाणी भेगा पडल्या असून गावाशेजारील माळरानात मोठमोठे दगड पूर्वी निखळून आलेले आहेत. हे दगड निखळून पुन्हा कधीही गावात येऊ शकतात.

या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या दगडांबरोबरच इतर दगडगोटे व राडारोडा पण गावातील लोकवस्तीवर येऊ शकतो, त्यामुळे माळीणसारखी पुनरावृत्ती येथे होऊ शकते.

तालुक्यातील संवेदनशील क्षेत्रात पाटण गावाचा समावेश येत असून प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

या भागातील भाजे व देवघर गावात 1989 साली मोठ्याप्रमाणात खराळ धासळल्याने जीवित व वित्तहानी झाली होती. एकविरा देवीच्या वेहेरगाव डोंगरावर देखील पावसाळ्यात दगडी पडण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. तालुका प्रशासनाने डोंगरभागात वसलेल्या या गावांवरील विघ्न दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.