Lonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजचा गुरुवात हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना अमृतांजन पुलाजवळ किमी नं 45/600 जवळ घडली. तर दुसरी घटना खोपोली हद्दीत ढेकू गावाजवळ घडली. 

पहिल्या अपघातात ट्रकच्या (एमएच-46- अेआर-5135) इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आगीने पेट घेतल्याने ट्रकच्या आतील केबिन व बोनेट जळाले. लोणावळा शहर पोलीस व रस्ते विकास महामंडळाच्या पथकाने सदरची आग विझवत अपघातग्रस्त वाहन बाजुला केले.

दुसरी दुर्घटना ही खोपोली हद्दीत ढेकू गावाजवळ घडली. यामध्ये द्रुतगती मार्गावरील पुलावरून एक टँकर खाली पडल्याने त्याला आग लागली व त्याने पेट घेतला. ही आग एवढी भयंकर होती की सर्वत्र धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा पहायला मिळत होत्या. पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

घटनेची माहिती समजताच देवदुत, डेल्टाफोर्स, बोरघाट पोलीस, हायवे पोलीस, आय आर बी पेट्रोलिगं, लोकमान्य हॉस्पिटल टीम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम, हायवे पोलीस यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान दोन्ही घटनांमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.