Lonavala: खंडाळा घाटात पैसे घेऊन अवजड वाहने सोडणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा, वाहतूक सेनेची मागणी

Lonavala: Action to be taken against officials who leave heavy vehicles in Khandala ghat for money, Transport Sena demands मागील दोन वर्षांपासून हे प्रकार सुरु आहेत. याबाबत महामार्गचे पोलीस अधिक्षक व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी माहिती दिल्यानंतरही कारवाई झालेली नाही.

एमपीसी न्यूज- खंडाळा घाटात पैसे घेऊन अवजड वाहने सोडणार्‍या महामार्ग पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार्‍या अवजड वाहनांना आरटीओची परवानगी घेऊन तसेच त्यांनी घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे योग्य ती काळजी घेऊनच घाट चढण्याचे व उतरण्याबाबत अधिसूचित केलेले आहेत.

तरीही खंडाळा महामार्गचे काही पोलीस अधिकारी या अवजड वाहन चालकांकडून पैसे घेऊन वाहने सोडत असल्याचा आरोप शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, 14 जून रोजी खंडाळा घाटातून पाच ते सहा मोठ्या ओडीसी गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

दि. 15 जून रोजी खंडाळा घाटात द्रुतगती मार्गावर असेच एक अवजड वाहन उलटल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुंबईच्या दिशेने जाणारा ताफा वळवून जुन्या राष्ट्रीय मार्गावरून वळविण्यात आला होता.

मागील दोन वर्षांपासून हे प्रकार सुरु आहेत. याबाबत महामार्गचे पोलीस अधिक्षक व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी माहिती दिल्यानंतरही कारवाई झालेली नाही.

मागील काळात येथील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात देखील पकडले गेले आहेत. ट्रान्सपोर्ट कंपन्यांशी व चालकांशी संगनमत करून ही वाहने घाटातून सोडली जातात.

शासनाचा महसूल बुडवून महामार्गचे काही अधिकारी स्वतःची तुंबडी भरण्याचे काम करत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी तसेच त्यांना पाठिशी घालणार्‍यांची चौकशी व्हावी अशी मागणी केदारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.