Lonavala : पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ नवनीत राणाचा रोड शो

एमपीसी न्यूज- महाआघाडीचे उमेदवार प‍ार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज लोणावळा शहरात सिनेअभिनेत्री नवनीत राणा यांच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते. पार्थ पवार यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राणा यांनी व्यक्त केला. 23 मे रोजी यापेक्षा मोठी विजयाची रॅली काढू असे त्या म्हणाल्या.
प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरात आज सकाळी दहा वाजता नवनीत राणा यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. राणा रोड शो ला येणार म्हटल्यावर महाआघाडीचे कार्यकर्ते सकाळपासूनच गवळीवाड्यातील श्रीराम मंदिरात जमा झाले होते. मात्र वाहतूक कोंडी व उष्णतेचा त्रास झाल्याने राणा यांना येण्यास उशीर झाला.

  • साडेबारा वाजता राणा यांच्या गैरहजेरीत रोड शो सुरु करण्यात आला. दरम्यान शिवाजी महाराज चौकात रॅलीमध्ये दाखल झालेल्या नवनीत राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रोड शो ला सुरुवात केली. मात्र यावेळी काँग्रेसच्या महिला पुणे जिल्हा उपाध्यक्षा अर्चना शहा व इतर मंडळींना बाजुला सारत राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे केवळ राणा यांनाच घेऊन चालू लागल्याने महिला पदाधिकारी व काँग्रेस पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी एकमेकाच्या पुढे जाण्याकरिता धक्काबुक्की झाल्याने काँग्रेसने तसेच राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी रोड शो अर्धवट सोडत माघारी जाणे पसंत केले. मात्र यानंतर लागलीच काँग्रेस नेत्यांनी रोड शो च्या नियोजनात गडबड झाली असली तरी लोणावळा काँग्रेस ही पूर्ण ताकतीने पार्थ पवार यांच्या सोबत आहे असा खुलासा केला आहे.
  • फोटो ट्रोल करुन काही होत नाही – राणा
  • प्रतिस्पर्धी उमेदवाराचे फोटो ट्रोल करुन काही होणार नाही. पार्थ पवार, अजित पवार यांच्यात दम आहे म्हणून ते बाहेर पडून निवडणूक लढवत आहेत. लोकांचे मत मिळविण्याचा दम त्यांच्यात आहेत. पुढील 23 तारखेला विजयाची मोठी मिरवणूक आम्हीच काढणार असे नवनीत कौर राणा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.