Lonavala :कौतुकास्पद ! ‘सिंहगड’च्या विद्यार्थ्यांकडून बोरवेलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचविणाऱ्या अभिनव यंत्राचा शोध

Admirable! Students of 'Sinhagad' invent an innovative device to save a person who has fallen in Borwal

एमपीसी न्यूज : सिंहगड महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या तीन विद्यार्थ्यांनी बोअरवेलच्या खड्डयात पडलेल्या मुलाला वाचविणाऱ्या अभिनव यंत्राचा शोध लावला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी या उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.

सौरव सैदाने, अमोल पाटील आणि अनिकेत शिंदे, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या तिघांनी बोअरवेलच्या खड्डयात पडलेल्या मुलांना कसे वाचवता येईल याचा अभ्यास केला.

या अभ्यासाअंती अवघ्या सहा महिन्याच्या संशोधनातून एक यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र भविष्यात बोअरवेलच्या खड्डयात पडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी वरदान ठरणार आहे.

उघड्या बोअरवेल मध्ये मुले पडण्याच्या अनेक घटना देशात सर्वत्र घडत असतात. सध्याच्या प्रचलित बचाव पद्धतीत बोअरवेलच्या बाजूला एक मोठा खड्डा केला जातो.

सोबतच बोअरवेलमध्ये समांतर छिद्र केले जाते. या प्रचलित तंत्राचा वापर अत्यंत किचकट असून त्यात वेळ, पैसा, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते, तरीही यश मिळेलच याची खात्री नसते.

त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले तंत्र व शोधलेल्या यंत्राचे महत्त्व निश्चित अधोरेखीत ठरते. हे उपकरण स्टँड आणि दोरीच्या साह्याने बोरवेलच्या आत सोडले जाते, हे बचाव कार्य दोन टप्प्यात पार पाडले जाते.

पहिल्या टप्प्यात सेंसर आणि कॅमेर्‍याच्या सहाय्याने सर्व्हे केला जातो, त्यावेळी हवेचा दाब ऑक्सिजनचा पुरवठा व मुलाच्या एकूण परिस्थितीची माहिती घेतली जाते.

दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष बचाव कार्य प्रारंभ होतो. हे यंत्र बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढते. या उपकरणामुळे बचाव कार्य 30 ते 40 मिनिटात पूर्ण होईल, असा विश्वास या विद्यार्थांनी व्यक्त केला. तसेच कॅमेऱ्यामुळे लाईव्ह व्हिडिओ पाहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

या उपकरणात विविध प्रकारच्या मोटर्स आणि सेन्सर्स वापरले आहेत शिवाय त्यात शक्तिशाली कॅमेराही वापरण्यात आला आहे. हे उपकरण दंडगोलाकार आहे त्याच्या पृष्ठभागात धातूची वर्तुळे वापरण्यात आले आहेत.

हवेच्या पिशव्याही जोडण्यात आल्या आहेत. यांत्रिक हात अलगद रित्या मुलाला पकडून उचलेल व हवेच्या पिशव्या कवचाचे काम करेल.

विद्यार्थांच्या या यशासाठी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले व सचिव डॉ. सुंनदा एम. नवले, संकूल संचालक प्राचार्य एम.एस. गायकवाड यांनी कौतुक केले.

विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. हे उपकरण बनवण्याच्या युक्तिपासून ते कसे बनवायचे याचे विशेष मार्गदर्शन ई अँड टीसीच्या प्रा. दिपाली केदार शेंडे यांचे लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.