Lonavala: शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यत खुली राहणार

दारुच्या दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा

एमपीसी न्यूज – मुंबई व पुणे या मोठ्या शहरांप्रमाणे लोणावळा शहरात देखील दारू दुकानांच्या बाहेर मंगळवारी मोठी गर्दी झाली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र बोजवारा उडवत बाजारपेठेत सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलीस प्रशासनाकडून पीए सिस्टिमद्वारे जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यवसायिकांना दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे लोणावळा शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार असल्याने नागरिकांनी विनाकारण बाजारपेठेत गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये लोणावळा शहरातील दारुच्या दुकानांसह इतर सर्व दुकाने मंगळवारी सकाळी उघडण्यात आली होती. सर्व बाजारपेठ उघडल्याने नागरिकांनी देखील बाजारात मोठी गर्दी केल्याने सर्व रस्ते गर्दीने फुलले होते. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत नागरिक फिरू लागल्याने शहरातील जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर बाजारातील गर्दी कमी झाली. दुसरीकडे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दारुची दुकाने उघडल्याने दारु खरेदीसाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. शंभर ते दोनशे मीटरपर्यत या रांगा लागल्या होत्या. दुकानासमोरील काही भाग वगळता सर्वत्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

नगरपरिषदेच्या डाॅ. बाबासाहेब डहाणूकर रुग्णालयाच्या बाहेर परप्रांतीयांनी आरोग्य प्रमाणपत्र घेण्याकरिता गर्दी केली होती. दिवसभरात पाचशेहून अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांना आरोग्य प्रमाणपत्र देण्यात आले. याकरिता वैद्यकिय अधिकारी व मदतनीस यांची पथके तयार करण्यात आली होती. लोणावळा शहराला कोरोनामुक्त ठेवण्याकरिता नागरिकांनी संयम पाळणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता अनावश्यक बाजारपेठेत गर्दी करणे धोक्याचे आहे.

जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी देखील केवळ नफा कमविण्याला प्राधान्य न देता सामाजिक भान जपत नागरिकांना सूचना देणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत. पोलीस प्रशासन व लोणावळा नगरपरिषद त्यांच्या पातळीवर नियोजनबद्ध काम करत असले तरी काही नागरिकांचा उतावीळपणा शहरवासीयांना नडण्य‍ाची शक्यता नाकारता येत नाही. गर्दी टाळण्याकरिता शहरातील सर्व दुकाने आता बारा तास खुली राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.