Lonavala : खंडाळा घाटातील अमृतांजन पूल होणार इतिहास जमा

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमी 45.500 याठिकाणी वापरात नसलेला ब्रिटिशकालीन अमृतांजन पुल आहे. ह्या पुलाच्या खालून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जातो. पुलामुळे मार्गावर वळण आले असून रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे वारंवार याठिकाणी अपघात घडत असल्याने तो वाहतुकीकरिता अडचणीचा ठरत होता. मागील काही महिन्यांपासून हा पुल पाडण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, द्रुतगती मार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य होत नव्हते.

सध्या भारतात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊन आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुक तुरळक असल्याने येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान, हा पूल पाडण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड यांना अवगत करुन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने परवानगी घेतली आहे. नियंत्रीत स्फोटकांचा वापर करुन सदर पुल पाडण्यात येणार आहे.

या कालावधी दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजुला जाणारी वाहतूक किमी 44 अंडा पाँईट येथून खंडाळा व लोणावळा शहरातून बाहेर काढण्यात येणार आहे तर मुंबई दिशेकडे जाणारी वाहतूक किमी 55 लोणावळा एक्झिट येथून खाली उतरवत लोणावळा व खंडाळा शहरातून अंडा पाँईट येथे द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारे द्रुतगती मार्गावरील दहा किमी अंतराची वाहतुक वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.