Lonavala : पाटणच्या महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ  करत मारहाण

दोन जणांवर मारहाणीसह अँट्रासिटीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील पाटणगावच्या महिला सरपंच रुपाली मंगेश पटेकर यांना जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केल्याप्रकारणी पाटण गावातील दोन जणांच्या विरोधात मारहाणीसह अँट्रासिटीचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ३) रात्री दाखल करण्यात आला आहे.
रुपाली मंगेश पटेकर (वय २८, रा. पाटण, ता.मावळ, जिल्हा पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाटण गावातील शंकर दिनकर तिकोने व बबन भवानजी तिकोने (दोघेही राहणार पाटण, ता. मावळ) यांच्यावर भादंवी कलम ३२४, ३२३, ३५४, ५०४, ५०६, ३४ व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कलम ३(१)(११) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास रुपाली पटेकर या त्यांच्या घरासमोर ओट्यावर भांडी घासत असताना त्याठिकाणी आलेले शंकर तिकोणे व बबन तिकोणे यांनी रुपाली यांना जातीवाचक व अश्लिल शिविगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी भांडण सोडविण्याकरिता आलेल्या रुपाली पटेकर यांच्या सासू इंदाबाई पटेकर व सासरे मारुती पटेकर यांना देखील शिविगाळ करत हाताने व काठीने मारहाण केली.

तसेच रुपाली पटेकर यांना हाताला धरुन अंगावर ओढून मनाला लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे झटापट करून मिठी मारत विनयभंग केला. त्यानंतर घराशेजारच्या काटेतारेवर धकलून देत जखमी केले. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा रुपाली पटेकर यांना गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांनी मानसिक त्रास दिल्याच्या घटना घडल्या आहेत.
  • मागील महिन्यात त्यांच्या घराच्या चौफेर तारेचे कंपाऊंड करत त्यांची घरकोंडी केली होती. या सर्व प्रकारांच्या तक्रारी वेळोवेळी पोलीस ठाण्यात दाखल आहेत मात्र त्यांची वेळीच दखल घेतली न गेल्याने आज पटेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी पटेकर यांच्या तक्रारीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे तपास करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.