Lonavala : शहरात सरासरी 58 टक्के मतदान; मतदानासाठी केंद्रावर रांगा

एमपीसी न्यूज- लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील लोणावळा शहरात पहिल्या दोन तासातील मतदारांचा अल्प प्रतिसाद वगळता नऊनंतर मात्र मतदारांचा उत्साह सर्वच मतदान केंद्रावर पहायला मिळाला. सायंकाळी सहापर्यत लोणावळा शहरात अंदाजे सरासरी 58 टक्के मतदान झाले.

लोणावळा नगरपरिषद शाळा क्र. 1, डाॅ. बी.एन.पुरंदरे विद्यालय, भोंडे हायस्कूल, पंडित नेहरु विद्यालय, वलवण, नांगरगाव, गवळीवाडा, तुंगार्ली, खंडाळा, र‍ायवुड, भुशी या भागात सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाकरिता नागरिकांनी रांगा लागल्या होत्या. दिव्यांगासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला.

  • नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सकाळी वलवण गावातील केंद्रावर जाऊन मतदान केले. दुपारी दीड वाजेपर्यत सर्वच केंद्र‍ांवर मतदारांचा रांगा पहायला मिळाल्या. यावेळी प्रथमच मतदान केंद्रावर विविध सुविधा केल्याचे चित्र पहायला मिळाले. असे असले तरी एकाच शाळेमध्ये तीन, चार, पाच अशी केंद्र देण्यात आल्याने त्याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. मतदारांच्या सर्वच केंद्र‍ांवरील रांगा लांबवर गेल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, मुख्याधिकारी सचिन पवार, मंडल अधिकारी बजरंग मेकाले यांच्या पथकांनी सर्व केंद्रांवर भेटी देत कामांमध्ये सुसुत्रता आणली.

काही ठिकाणी लोकप्रतिनिधी शंभर मीटरच्या आतमध्ये घुसल्याच्या तक्रारी विरोधी गटांनी केल्या. पोलिसांनी अशा संवेदनशील ठिकाणी जादा कुमक मागवत सर्वांना बाहेर जाण्याच्या सूचना करत वातावरण शांत केले. भुशी येथील मतदान केंद्र क्रमांक 141 येथील मशिनला अडथळा आल्याने त्याठिकाणावरील डाटा रिकव्हर करत नवीन मशीन लावण्यात आली. शहरातील सर्व 39 केंद्र‍ांवर विना अडथळा शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली.

  • मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार व श्रीरंग बारणे यांच्यातील ही अस्तित्वाची निवडणूक असल्याने महायुती व महाआघाडी दोन्हीचे कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांना घराबाहेर काढत मतदान करवून घेत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. इतर तालुक्यातील मान्यवर मंडळी सेखील मतदान केंद्रांना तसेच कार्यकर्त्यांना भेटी देत होते.

पार्थ पवार यांनी दुपारी लोणावळा व खंडाळा येथील बुथवर भेटी देत कार्यकर्त्यांचा तसेच मतदारांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषद निवडणुकीच्या मानाने लोणावळ्यात लोकसभा निवडणुकीला मतदान कमी झाले असले तरी मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत टाकले हे 23 मे रोजीच कळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.