Lonavala : घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची कोरोनाबाबत जनजागृती

एमपीसीन्यूज : कोरोना आजाराची माहिती व नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत लोणावळा शहरात घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

लोणावळा शहरातील घरोघरचा कचरा व बाजारपेठेतील तसेच सार्वजनिक ठिकाणचा कचरा घंटागाड्याच्या माध्यमातून गोळा केला जातो. लोणावळा शहराने मागील तिन वर्ष स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उत्कृष्ट कार्य केले आहे. शहरात कचरा गोळा करण्याकरिता घरोघरी व सोसायट्यांमध्ये जाणार्‍या सर्व घंटागाड्यावर स्पिकर बसविण्यात आले आहेत.

तसेच जीपीएस सिस्टिम असल्याने गाडी कोणत्या भागात गेली याची सर्व माहिती नगरपरिषद कंट्रोलरुममध्ये बसून पहायला मिळते. स्वच्छ सर्वेक्षण काळात या घंटागाड्या स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती करत होत्या. आता या गाड्या कोरोनाबाबतही जनजागृती करत आहेत.

सकाळी दिवसाची सुरुवात जनजागृतीच्या गाण्यांनी होत आहे. स्पिकरच्या माध्यमातून कोरोना आजाराविषयी माहिती तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी, यामध्ये सतत हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, चेहर्‍यावर मास्क लावणे आदींचा संदेश दिला जात आहे.

घंटागाडी प्रत्येक विभागात जात असल्याने शहरातील लहान मोठ्या सर्व व्यक्तींना कोरोनाबाबतची माहिती व सुचना दिल्या जात आहेत. नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रिनवरील आरोग्य सेतू अँपवर माहिती कशी भरावी याबाबत माहिती दिली जात आहे.

कोरोनापासून बवाच करण्याकरिता नियमांचे पालन व आरोग्याची काळजी घेणे या महत्वाच्या बाबी असल्याने याबाबत जनजागृतीवर सर्वांधिक भर देण्यात आला असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.