Lonavala : धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या – पाटील

शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन

एमपीसी न्यूज- राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष, 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद व श्रीराम जन्मभूमी यावर होणारा निर्णय तसेच 10 नोव्हेंबर रोजी होणारी ईद ए मिलापची मिरवणूक या कोणत्याही घटनेमुळे लोणावळा शहरात धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता समाजातील प्रत्येक घटकांने घ्यावी असे आवाहन लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी आज, मंगळवारी पार पडलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केले.

पाटील म्हणाले, “9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिद व श्रीराम जन्मभूमी याबाबतचा निर्णय होणार आहे. जो काही निर्णय लागेल तो न्यायालयीन निर्णय असून सर्वांवर बंधनकारक असणार आहे. या निर्णयाचे स्वागत अथवा त्याविरोधात कोणीही प्रतिक्रिया देऊन आपल्या शहरातील वातावरण खराब करु नये. काही समाजकंटक मंडळी या घटनांचा फायदा घेत समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न करतात. अशा मंडळींना जागीच आळा घालण्याकरिता प्रत्येकाने जागृत राहणे गरजेचे आहे”

“लोणावळा शहर पर्यटनस्थळ असल्याने याठिकाणी घडणार्‍या घटनांचा परिणाम दूरगामीपणे या शहराच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. लोणावळा शहरात पूर्वीपासून सर्व जातीधर्माचे लोक सर्वधर्म समभावाने एकत्र राहतात, सर्व सण उत्सव साजरे करतात. असेच खेळीमेळीचे वातावरण शहरात राहणे अपेक्षित आहे. शहराबाहेरुन कोणी तरी येऊन येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याला तात्काळ रोखायला हवे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कोणत्याही राजकिय पक्षाचा किंवा संघटनेचा निर्णय नसून तो घटनेच्या आधारावर सर्व साक्षीपुरावे याचा अभ्यास करुन विधीगत निर्णय आहे. याचा कोणीही फायदा घेण्याची आवश्यकता नाही. निर्णय कोणताही असला तरी तो कायदेशिरपणे स्वीकारणे बंधनकारक असल्याने त्यांचा परिणाम येथे होता कामा नये” असे पाटील म्हणाले.

अशा घटनांमध्ये दाखल झालेले गुन्हे हे आपल्या मुलांचे आयुष्य खराब करु शकतात याकरिता पालकांनी मुलांना सक्त ताकिद द्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. उपस्थित शांतत‍ कमिटी सदस्यांनी देखील याकाळात पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत मत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.