Lonavala : भाजपाची प्रचार रॅली तर राष्ट्रवादीच्या कोपरा सभेने प्रचाराची सांगता

पावसामुळे प्रचाराची दाणादाण

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदार संघात जाहीर प्रचाराची आज सांगता झाली. लोणावळा शहरात भाजपाचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचारानिमित्त शहर भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीच्या वतीने भांगरवाडी ते शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान प्रचार रॅलीचे आयोजन केले होते तर आरपीआयच्या वतीने सिद्धार्थनगर परिसरात रॅली काढण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व एसआरपी महाआघाडीच्या वतीने उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचाराकरिता गवळीवाडा ते भांगरवाडी दरम्यान आयोजित केलेली प्रचार रॅली ही पावसामुळे रद्द करत गवळीवाडा येथे कोपरा सभा घेण्यात आली.

भेगडे व शेळके या दोन्ही उमेदवारांनी मागील पंधरा दिवस मावळ तालुक्यात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. या व्यतिरिक्त जाहिर सभा, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचारपत्रके व वचननामे घरोघरी पोहचविण्यात आले. सोशल मिडियावर आपला उमेदवार कसा विकासाचा चेहरा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून करण्यात आला.

निवडणुक आयोगाच्या नियमांप्रमाणे आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता जाहिर प्रचाराची सांगता झाली. पुढिल काही काळ छुपा प्रचार केला जाणार आहे. याकाळात मतदाराला आमिष दाखविण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते याकरिता पोलीस यंत्रणा व निवडणुक आयोगाच्या पथकाने शहरातील महत्वाचे रस्ते तसेच स्लम भागावर करडी नजर ठेवली आहे. लोकशाहीतील सर्वात मोठी प्रक्रिया असलेले मतदान हे भयमुक्त वातावरणात व्हावे याकरिता मोठा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.