Lonavala : दोन हजार समर्थकांसह बाळासाहेब नेवाळे यांनी ‘राष्ट्रवादी’ला ठोकला रामराम!

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी पक्षाचे वर्षानुवर्षे तन-मन-धनाने काम करुन देखील राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी नाकारत भाजपातील बंडखोराला उमेदवारी जाहिर केल्याने नाराज झालेले मावळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी आज मेळावा घेत दोन हजार समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला. ऐन निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना नेवाळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मावळात राष्ट्रवादीला खिंडार पडले असून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचा चेहरा म्हणून बाळासाहेब नेवाळे यांची ओळख आहे. मागील पंधरा वर्षापासून ते विधानसभेची उमेदवारी मागत असताना त्यांना कायम डावलण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाने घेतली. यावेळी ते उमेदवारी करिता तीव्र इच्छूक असताना देखील त्यांना डावलत ऐनवेळी भाजपात बंडखोरी करुन बाहेर पडलेले सुनील शेळके यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नेवाळे नाराज झाले होते.

नेवाळे यांना मानणारा मोठा वर्ग मावळच्या ग्रामीण भागात आहे. या सर्व समर्थकांशी चर्चा करत आज नेवाळे यांनी आज वडगाव मावळ येथील भेगडे लाॅन्समध्ये मेळावा घेत दोन हजार समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला. येत्या दोन दिवसात पुढील राजकिय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे यावेळी नेवाळे यांनी सांगितले.

यावेळी बाळासाहेब नेवाळे म्हणाले, ज्या पक्षाकरिता आम्ही अहोरात्र मेहनत घेतली तो पक्षच जर ग्रामीण अस्मितेचा अपमान करणार असेल तर तेथे राहण्यात काय अर्थ आहे. मावळच्या ग्रामीण भागात व लोणावळा, देहुरोड, देहु या भागात मिळून जवळपास दोन लाख मतदान असताना कायम याभागावर राष्ट्रवादीने अन्याय केला. सर्व पदे शहरी भागाला, उमेदवारी शहरी भागाला, रोजगार, उद्योग व्यावसाय, शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा सर्व शहरी भागाला देत कायम ग्रामीणवर अन्याय केला आहे. पक्षाच्या ह्या दुटप्पी धोरणाला कंटाळून पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे नेवाळे यांनी सांगितले. येत्या निवडणुकीत ग्रामीणची ताकद काय आहे? हे दाखवून देऊ असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.