Lonavala : पक्षविरोधी मतदान करणार्‍या भाजपाच्या तीन नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा प्रस्ताव

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे गटनेते व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करत विरोधी पक्षाला मदत करणार्‍या महिला नगरसेविका गौरी मावकर व मतदानाच्या वेळी सभागृहात गैरहजर राहणारे नगरसेवक भरत हारपुडे व जयश्री आहेर या तीन जणांची भाजपा पक्षातून हकालपट्टी करत त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व गटनेते देविदास कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपाच्या तीनही नगरसेवकांनी जाणीवपूर्वक आर्थिक देवाणघेवाण करत भाजपाचे गटनेते देविदास कडू, सहयोगी पक्ष असलेल्या आरपीआयचे नगरसेवक दिलीप दामोदरे व काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिर्के यांच्या विरोधात मतदान केले, गैरहजर राहिले असा आरोप करीत हा सरळसरळ विश्वासघात असल्याने या तिन्ही लोकप्रतिनिधींची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे.

लोणावळा नगरपरिषदेत भाजपा, आरपीआय व काँग्रेस यांची सत्ता असून शिवसेना विरोधात आहे. विषय समितीमधील सदस्य हे सभापतींना मतदान करतात. याची कल्पना असल्याने समितीमध्ये सदस्य होण्याकरिता बंडखोरी करणार्‍या नगरसेविकांनी रडून स्वतःची नावे घालून घेतली. सभागृहात जाईपर्यत ते आमच्या सोबत होते. एकत्र जेवण करुन एकमेकाला हात मिळवून शुभेच्छा देत सभागृहात गेल्यानंतर गौरी मावकर यांनी विरोधात मतदान केले तर भरत हारपुडे व जयश्री आहेर हे सभागृहात आलेच नाहीत.

सोबत राहून गोड बोलून त्यांनी बंडखोरी केल्याने भाजपा, आरपीआय व काँग्रेस यांना प्रत्येकी एका सभापतीपदाला मुकावे लागले. आमचे नगरसेवक विकले गेल्याने आमच्या गटनेत्यासह मित्र पक्षांना सभापती पदाला मुकावे लागले अशा शब्दात नगराध्यक्षा सुरेखा जाधव व श्रीधर पुजारी यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. सभापती निवडीतील घटनाक्रमानंतर बंडखोर नगरसेवकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गटनेते देविदास कडू, नगरसेवक राजाभाऊ खळदकर, मंदा सोनवणे, रचना सिनकर, ब्रिंदा गणात्रा, आरपीआयचे नगरसेवक दिलीप दामोदरे, काँग्रेसचे नगरसेवक निखिल कविश्वर, सुधिर शिर्के, विजय सिनकर, आशिष बुटाला आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.