Lonavala: हुडको व भांगरवाडीतील दोन्ही कोरोना संशयितांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

Lonavala: Both HUDCO and Bhangarwadi corona suspects report 'negative

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील हुडको, सह्याद्री नगर, व भांगरवाडी सुमित्रा हाॅल परिसरातील दोन्ही संशयित व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर खोटे मेसेज फॉरवर्ड करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर आजपर्यत लोणावळा शहरात आलेल्या तब्बल बाराशे जणांना लोणावळा नगरपरिषदेने क्वांरटाईन केले आहे. सध्या साडेचारशे नागरिक होम व इन्स्टिट्युट क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत लोणावळा शहरातील एकूण 11 संशयित रुग्णांचे स्वॅब करोना चाचणी साठी पाठवण्यात आले असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले आहेत.

ही लोणावळाकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मात्र नागरिकांना व प्रशासनाला गाफिल राहून चालणार नाही. मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मावळात कोरोनाचे 12 रुग्ण झाले असल्याने लोणावळ्यात देखील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या शासनाच्या आदेशानुसार नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.

लोणावळा शहरात दररोज सरासरी 35 ते 40 जण परवाना घेऊन येत आहे. जे विना परवाना येत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. असे असले तरी काही जण लपून छपून शहरात घुसण्याचा प्रयत्न करतात, नागरिकांनी जागृत राहून आपल्या आजूबाजूला कोणी नवीन व्यक्ती आल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाला माहिती द्यावी, सतर्कता म्हणून येणार्‍या प्रत्येकाला क्वारंटाईन करून आरोग्य अधिकारी तपासणी करत असल्याने कोरोनाची लागण होणे व पसरणे थांबणार असल्याने नागरिकांनी शहरात आल्यानंतर माहिती लपवू नये असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोणावळा शहरात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. मात्र याला लोणावळेकर नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित आहे. नागरिकांनी करोना संदर्भात देण्यात आलेल्या शासकीय निर्देशांचे काटेकोर पालन करावे. घराच्या बाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करावा, तसेच सार्वजनिक ठिकाणं, बाजारपेठ, लग्नकार्य, अंत्यविधी आदी गर्दीची ठिकाणे टाळून, जास्तीत जास्त सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.