Lonavala: हाॅटेलच्या पार्किंगमधून कार पळविणारा जेरबंद

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील पिकाडेल हाॅटेलच्या पार्किंगमधून स्विफ्ट डिझायर कार पळविणारा चोरटा शिरुर येथे नाकाबंदी दरम्यान जेरबंद झाला आहे. याप्रकरणी कारमालक जमिलउद्देन अब्दुलहसन खान (रा.वडाळा, मुंबई) यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात वाहन चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती.

सुभाष वसंत गायकवाड (वय 38, रा. शिरपुर, ता.पारमेर अहमदनगर) असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हे 14 मार्च रोजी पिकाडेल हाॅटेलात आले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते आंघोळीकरिता गेले असता गायकवाड याने रुममध्ये प्रवेश करत खानच्या खिशातील कारची चावी चोरली आणि पार्किंगमधून वाहन पळविले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोणावळा पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यात माहिती कळवली. आरोपी हा पिकाडेल हाॅटेलात नियमित भाडे घेऊन येत असल्याने त्याला येथील माहिती होती.

लोणावळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नाकाबंदी सुरु असताना शिरुर पोलीसांनी गायकवाड याला वाहनासह ताब्यात घेतले. लोणावळा शहरचे जयराज देवकर, अमोल गायकवाड, मनोज मोरे, प्रशांत खुटेमाटे यांच्या पथकाने शिरुर येथून आरोपीला चोरलेल्या कारसह ताब्यात घेत अटक केली. आरोपीने यापुर्वी देखील अशाच पध्दतीने काही वाहने चोरल्याची शक्यता शहर पोलीसांनी वर्तवली असून याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.