Lonavala : परिसरात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सवात साजरी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे आलेली शिवजयंती आज लोणावळा शहरासह गावोगावी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. गावोगावचे शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, लोहगड, विसापुर, तिकोना, राजमाची, तुंग, वित्तडगड, कोराई गड, इंदोरी, राजगड, सज्जनगड, पन्हाळा, चावड अशा विविध गडांवर शिवज्योती आणण्याकरीता गेले होते. आज सकाळपासूनच या शिवज्योतीचे आगमन लोणावळा शहरात झाले.

लोणावळ्यातील मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याकरिता शहर व ग्रामीण भागातील सर्व शिवज्योती येत होत्या. भाजी मार्केटच्या मुख्य चौकात दरवर्षीप्रमाणे हिंदु समिती लोणावळा शहर व ग्रामीण, श्री योध्दा प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व शिवज्योतींचे व शिवजयंती मंडळांचे स्वागत करण्य‍ात आले तसेच आलेल्या शिवभक्तांना पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

तरुण तरुणी हातात भगवे झेंडे व शिवज्योती घेऊन धावत होते, अतिशय उत्साहपूर्ण वातावरण व जल्लोषात शिवजयंतीचा हा सण साजरा करण्यात आला. भांगरवाडी येथील शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने स्वागत कमान लावण्यात आली होती.

लोणावळा शहरातील तुंगार्ली, भांगरवाडी, नांगरगाव, वलवण, खंडाळा, रामनगर, भुशी, कुसगाव, डोंगरगाव, कुसगाववाडी, ओळकाईवाडी, औंढे, औंढोली, वरसोली, वाकसईचाळ, वाकसई, देवघर, करंडोली, कार्ला, वेहेरगाव, मळवली, शिलाटणे, सदापुर, पाटण, बोरज, प‍ाथरगाव, भैरवनाथनगर, हनुमान टेकडी यासह गावोगावी ढोल ताश्यांच्या गजरात शिवप्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली होती.

तुंगार्ली व कुसगाव यांच्या मिरवणुका दरवर्षीप्रमाणे जल्लोशात काढण्यात आल्या होत्या. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व सर्व कर्मचारी वर्ग चौकात हजर होते. हिंदु समितीचे कार्यकर्ते शिवज्योतीच्या स्वागतासाठी सकाळपासून चौकात हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.