Lonavala : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावे : नगरपरिषद व पोलिसांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज : जगभरात कोरोना आजाराच्या विषाणूंनी थैमान घातले असताना लोणावळा शहर व मावळ तालुका मात्र कोरोनापासून मुक्त राहिला आहे. आपले शहर, गाव व तालुका कोरोनामुक्त ठेवायचा असेल तर नागरिकांनी देखिल स्वंयशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत पोलीस व नगरपरिषद प्रशासनाकडून व्यक्त केले जात आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोणावळा शहरात लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये नगरपरिषदेकडून शहरात सर्वत्र सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी, जंतूनाशक पावडर फवारणी, सोशल डिस्टन्सिंगकरिता दुकानांच्या बाहेर चौकोनी मार्किंग, बाजारभागात निर्जंतुकीकरण कक्ष, जागोजागी हात धुण्याकरिता हॅन्ड वाॅश कक्ष, फ्लू क्लिनिक, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून हाय रिस्क रुग्णांची तपासणी, क्वारंटाईन कक्ष, पीपीई किट, दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गोरगरीबांना धान्य व जेवणाचे डबे वाटप, स्थलांतर करून आलेल्या वाटसरुंना संक्रमण शिबिराच्या माध्यमातून राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने पीए सिस्टमद्वारे गावात सर्वत्र कोरोनाच्या अनुषंगाने जनजागृती व गस्त सुरू केली. नगरपरिषदेच्या सहकार्याने शहरातील 19 अंतर्गत रस्ते बंद करत कुमार चौक, भांगरवाडी इंद्रायणी पूल व खंडाळा राजमाची गार्डन येथे चेकपोस्ट तयार करत विनाकारण फिरणारे नागरिक व वाहनचालक यांच्यावर कारवाई मोहिम हाती घेत जवळपास दिडशे लोकांवर संचारबंदीचे गुन्हे दाखल केले. बाजारभागातील गर्दी टाळण्याकरिता सर्व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी आठ ते दुपारी एक व मेडिकल दुकाने सकाळी आठ ते सायंकाळ सहा असे वेळापत्रक तयार केले. सार्वजनिक कार्यक्रमातून नागरिक एकत्र जमणार नाहीत याची दक्षता घेतली.

लोणावळा नगरपरिषद व लोणावळा पोलीस रात्रंदिवस घराबाहेर राहून लोणावळा शहर व येथिल नागरिक हे कोरोनामुक्त कसे राहतील याकरिता प्रयत्न करत असताना काही नागरिक मात्र या प्रयत्नांना हरताळ फासत नियमांचे उल्लंघन करत बाजारभागात विनाकारण गर्दी करत आहेत. पुर्वी आठवडाभराची भाजी एकदम घेऊन जाणारे सध्या रोज सकाळ संध्याकाळ भाजीच्या पिशव्या घेऊन बाजारात फिरत आहेत. रिकामे सिलेंडर गाडीला लावून फिरणे, दवाखान्याच्या जुन्या फाईल घेऊन जोडीने बाजारात जाणे, मेडिकलची जुनी पुरानी चिट्टी, बॅकेचे पासबुक, लहान बाळ सोबत घेऊन दवाखान्यात चाललो असल्याचे भासवत बाजारात मुक्तसंचार करत आहेत.

यापैकी काहीजण खरंच कामानिमित्त बाहेर पडतात हे खरे असले तरी बहुतांश लोक घरात कंटाळा आला म्हणून बाजारात चक्कर मारण्याकरिता जात आहेत हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. चेकनाक्यावर नागरिकांची वेगवेगळी कारणे ऐकून पोलीस कर्मचारी देखील चक्रावून गेले आहेत. केव्हाही घराबाहेर न पडणारी मंडळी सकाळ व संध्याकाळ वाॅकच्या नावाखाली घराबाहेर मुक्तपणे फिरत आहेत. रात्री जेवणानंतर शतपावली घालणार्‍यांची संख्या तर मेंदूला मुंग्या आणणारी आहे. सोशल मिडियावरून काही जागरुक नागरिक याबद्दल आवाज उठविण्याचा प्रयत्न करतात. त्यांची दखल घेऊन प्रशासन कारवाई देखिल करते मात्र प्रत्येक गोष्ट प्रशासनावर सोपवून देखिल चालणार नाही.

स्वतःला व आपल्या शहराला कोरोना सारख्या महाभयंकर महामारीपासून वाचविण्याकरिता प्रत्येक नागरिकांनी स्वंयशिस्त पाळणे फार गरजेचे असल्याचे मत मुख्याधिकारी सचिन पवार व पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी व्यक्त केले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता प्रशासनातील प्रत्येक घटक स्वतःचा जीव धोक्यात घालत रात्रंदिवस काम करत असताना त्याला नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे. चेकनाक्यावर नागरिक प्रशासनाला फसवून पुढे जात नाही तर स्वतःच्या मनाला फसवून स्वतःचे व त्याचे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य धोक्यात घालत आहे. तेव्हा घरात रहा सुरक्षित रहा, कोरोनाशी लढणार्‍या प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन या पवार आणि यादव यांनी केले आहे.

बाजारभागातील गर्दी चिंता वाढविणारी

बाजारभागातील गर्दी टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी आठ ते दुपारी एक या कालावधीमध्ये सुरु ठेवण्याचे आदेश आहेत. शहरातील सर्व विभागात भाजीपाला व किराणा दुकाने सुरु असताना देखिल नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. सकाळच्या सत्रात दररोज बाजारभागात होणारी गर्दी ही चिंता वाढविणारी आहे. तसेच बाजारपेठेत भाजीपाला व फळ विक्रेत्यांची वाढलेली संख्या देखिल अनाकलनीय आहे.

गर्दी टाळण्याकरिता भाजी मंडईचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले. मंडईत केवळ 18 परवानाधारक दुकानदार असताना आज जयचंद चौक ते भांगरवाडी दरम्यान भाजीपाल्याची पंन्नास व फळांची चाळीस दुकाने झाली आहेत. ही दुकाने कोठून आली, त्यांना भांडवल व माल कोणी पुरवला याबाबत आता प्रश्न उपस्थित होत असून बाजारभागातील गर्दी रोखण्याकरिता विक्रेत्यांची ही संख्या कमी करण्याकरिता प्रशासनाकडून पावले उचलली जावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.