Lonavala : शाळकरी विद्यार्थ्यांचा शहरात स्वच्छतेचा जागर

एमपीसी न्यूज- नवरात्र उत्सवात सर्वत्र शक्ती स्वरुपींनी देवीचा जागर सुरु असताना लोणावळा शहरात शाळकरी मुला मुलींनी स्वच्छतेचा जागर सुरु केला आहे. आॅक्झिलियम काॅन्व्हेंट स्कूलच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवाची सुरुवात स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आली. लोणावळा शहरातील सर्व खाजगी शाळांनी एकत्र येत स्वच्छतेचा जागर शहरात सुरु केला आहे.

लोणावळा परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आज शहरातून उगम पावणार्या इंद्रायणी नदीपात्राच्या दुतर्फा स्वच्छता मोहीम राबवत कचरा व गवत गोळा केले. त्यानंतर लोणावळा नगरपरिषद रुग्णालयासमोरील रस्ता, भाजी मार्केट या सर्व परिसरांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
आरोग्य समिती सभापती ब्रिंदा गणात्रा, नगरसेवक देवीदास कडू, आरोग्य अधिकारी दिगंबर वाघमारे यांच्यासह शाळांचे शिक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी या मोहिमेत विद्यार्थ्यांच्या सोबत सहभागी झाले होते. ऑक्झीलियम कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त तीन दिवस स्वच्छतेचा जागर करणार्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी शाळेच्या प्रांगणामध्ये स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या प्रबोधनपर नाटिका सादर करण्यात आल्या. तसेच चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, फॅन्सी स्पर्धा घेण्यात आल्या. शहरातील विविध शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, ऑक्झिलियमच्या मुख्याध्यापिका शीला फुटाडो हे यावेळी उपस्थित होते.
