Lonavala : कोरोनावर नियंत्रण राखण्यात महाआघाडी सरकार अपयशी- प्रवीण दरेकर

Coalition government fails to control Corona: Pravin Darekar:लाॅकडाऊनचा निर्णय जनतेसाठी अन्यायकारक

एमपीसीन्यूज : महाराष्ट्रात कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यात महाआघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. कोरोना (कोव्हिड19) संदर्भात महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या दरेकर यांनी आज, गुरुवारी लोणावळा नगरपरिषदेला भेट देत पत्रकारांशी संवाद साधला.

दरेकर म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर महाआघाडी सरकारने ज्या पद्धतीने उपाययोजना करायला हवी होती, आरोग्य यंत्रणा हाताळायला हवी होती ते तसे न झाल्याने दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत, उपचारा अभावी नागरिकांचा दुदैवी मृत्यू होत आहे.

दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र दौरा करून नागरिकांच्या प्रश्नांवर 14 पानाचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले. मात्र, त्यांनी अजूनही आम्हाला चर्चेला वेळ दिला नाही.

अशी शासनकर्ते व प्रशासन यांच्यात विसंवाद असल्याची अनेक उदाहरणे ताजी आहेत. सरकारमध्ये विसंवाद, विस्कळीतपणा व समन्वय‍ाचा अभाव असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

दरम्यान, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते प्रवीण दरेकर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार रमेश पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, भाजपाचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, कलमशिल म्हस्के, भाजपा गटनेते देविदास कडू यांच्यासह नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, संध्या खंडेलवाल, आरोही तळेगावकर, मंदा सोनवणे, सुधीर शिर्के, योगिता कोकरे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

झटका आला की लाॅकडाऊन

महाराष्ट्रात कोणाला झटका आला की लाॅकडाऊन केले जात आहे. लाॅकडाऊन करताना कोणालाही विश्वासात घेतले जात नाही. एक दोन जणांना वाटले की केले लाॅकडाऊन. हा प्रकार जनतेवर अन्याय करणारा आहे.

योग्य नियोजन करून नागरिक, लोकप्रतिनिधी, व्यापारी या सर्वांना विश्वासात घेऊन लाॅकडाऊन केल्यास तो अधिक यशस्वी होऊ शकतो, असेही दरेकर यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.