Lonavala : INS शिवाजी येथे विशेष अभ्यासक्रम तुकडीचा दीक्षांत समारंभ

convocation ceremony of marine engineering specialisation course at INS shivaji

एमपीसी न्यूज – नौदलाच्या ‘INS शिवाजी’ येथे सागरी अभियांत्रिकी विशेष अभ्यासक्रम तुकडीचा 89वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. यात भारतीय नौदलाचे अधिकारी आणि इतर मित्र देशातील नौदलाच्या 48 अधिकाऱ्यांनी 105 आठवड्यांचे हे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केले.

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, या अधिकाऱ्यांनी, या दीक्षांत समारंभात, नौदलाच्या पांढऱ्या गणवेशासोबतच पांढरे शुभ्र मास्क वापरले होते; तसेच दोन मिटरच्या शारीरिक अंतराचेही पालन केले होते. ‘INS शिवाजी’चे कमांडिंग ऑफिसर आणि लोणावळ्याचे स्टेशन कमांडर, कमोडोर रविंश सेठ यांची या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय नौदलाच्या सर्व सागरी अभियंत्याचे पहिले प्रशिक्षण केंद्र ठरलेले INS शिवाजी, हे लोणावळ्यात सह्याद्रीच्या कुशीत स्थापन करण्यात आलेले पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. ही संस्था अभियांत्रिकी ज्ञानाचे उगमस्थान असून, अभियांत्रिकी शाखेतील नौदल अधिकारी आणि खलाशी यांना प्रशिक्षित करणे, या संस्थेचे खास वैशिष्ट्य आहे. INS शिवाजी येथे, MESCच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण 2 जानेवारी 1961 साली पूर्ण झाले होते. तेव्हापासून या संस्थेतून, 88 तुकड्या प्रशिक्षित होऊन बाहेर पडल्या आहेत. या संस्थेच्या 89 व्या तुकडीत, 37 अधिकारी भारतीय नौदलाचे, तर 11 अधिकारी विविध मित्र देश, जसे श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, सुदान, फिजी आणि बांगलादेश या देशातील नौदल अधिकारी आहेत.

सागरी अभियांत्रिकी विशेष अभ्यासक्रमाच्या तीन टप्प्यातील कठोर प्रशिक्षणादरम्यान, अधिकाऱ्यांना चालू उपकरणे, अत्याधुनिक सिम्युलेटर्स, प्रशिक्षण किट्स या सगळ्यांद्वारे प्रशिक्षित केले जाते. त्याशिवाय सर्वसमावेशक स्वरूपाची माहिती, व्याख्यानांमधूनही दिली जाते. त्यासोबतच, इंजिन रूम वॉचकीपिंग सर्टिफिकेट, या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, अधिकाऱ्यांना नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांव, 26 आठवड्यांचे सागरी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर हे सर्व अधिकारी, आघाडीवरील युद्धनौकांवर, सहायक/ वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी म्हणून पहिल्या नियुक्तीचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत.

दीक्षांत समारंभात बोलतांना कमांडिंग ऑफिसरने, व्यावसायिक अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या अधिकाऱ्यांनी आपली जिज्ञासूवृत्ती आजन्म कायम ठेवावी जेणेकरुन, ते पुढेही व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून नवनव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करु शकतील, असे मार्गदर्शन त्यांनी केले. आपल्या कामात उच्च गुणवत्ता कायम ठेवत, प्रत्येक प्रयत्न उत्कृष्ट करावा, असा सल्ला त्यांनी दिला. कोविड-19 च्या कठीण काळात भारतीय नौदलाने देशासाठी दिलेल्या सेवेचाही त्यांनी उल्लेख केला.

या प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, सर्व क्षेत्रात, प्रथम आलेल्या अधिकाऱ्याचा कमांडिंग ऑफिसरच्या हस्ते चषक देऊन सत्कार करण्यात आला, त्याशिवाय सर्वोत्कुष्ट क्रीडापटू आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अधिकारी अशी दोन चषकेही प्रदान करण्यात आली. ‘हॅमर’ हा सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्याचा पुरस्कार लेफ्टनंट भारत खंडपाल यांना, ‘सर्वोत्कृष्ट क्रीडापटूचा’ ‘व्हाईस अडमिरल दया शंकर’ फिरता चषक लेफ्टनंट दिव्यांश सिंगला यांना, तर सर्वोकृष्ट आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्याचा फिरता चषक, बांगलादेश नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट कमांडर मोहम्मद मेहेदी हसन यांना प्रदान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.