Lonavala : कोरोना; नगरपरिषदेकडून चार वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : लोणावळा नगरपरिषदेच्या डहाणूकर रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषदेने चार वैद्यकीय अधिकार्‍यांची तात्पुरत्या स्वरुप‍ात नियुक्ती केली असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. रुग्णालयात नगरपरिषदेने ओपीडी सुरु केली असून त्याठिकाणी नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 

या करिता नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी लोणावळा शहरातील मेडिकल व्यावसायकांना औषधांची मदत करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार खंडेलवाल मेडिकल यांनी नगरपरिषद रुग्णालयाला आवश्यक औषधांचा पुरवठा करुन कोरोना आपत्तीमध्ये योगदान दिले आहे. शहर‍ातील इतरही मेडिकल व्यावसायकांनी या कार्यात सहभाग नोंदवत कोरोना लढाईत प्रशासनाला व लोणावळा नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.

दोन शाळांमध्ये संक्रमण शिबिरे

कोरोना व लाॅकडाऊनमुळे शहरात आडकून पडलेले गरजू, गरिब कामगार यांच्याकरिता लोणावळा नगरपरिषदेने पंडित जवाहरलाल नेहरु प्राथमिक शाळा (60 नागरिक) व संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा (50 नागरिक) येथे संक्रमण शिबिरे तयार केली आहेत. या नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तु पुरविण्यात आल्या असून सकाळ संध्याकाळ त्यांची आरोग्य चौकशी व तपासणी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून केली जात आहेत.

 

दोन ठिकाणी काॅरंनटाईन सेंटर; 20 पीपीई किट

 

लोणावळा नगरपरिषदेची भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा व आयएनएस शिवाजी येथिल रुग्णालयात प्रत्येकी 20 बेडचे क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहेत. तसेच 20 पीपीई किट घेण्यात आले आहेत.

 

वैद्यकीय अधिकार्‍यांना सहकार्य करा

 

लोणावळा शहरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून घरोघरी जाऊन नागरिकांची चौकशी व तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी याकामी वैद्यकिय अधिकार्‍यांना सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.

 

सोडियम हायपोक्लोराईंडची फवारणी

 

लोणावळा शहराचा परिसर निजंतूकरण करण्यासाठी शहरातील सर्व परिसरात व रस्त्यांवर सोडियम हायपोक्लोराईंडची फवारणी अग्नीशमन बंबाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. फवारणीची दुसरी फेरी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सर्व उपाययोजना ह्या नागरिकांच्या आरोग्याकरिता करण्यात येत असल्याने शहरवासियांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.