Lonavala : बाजारपेठेतील पोर्टर चाळीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Corona positive patients in the market porter chawl

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनी याठिकाणी राहणाऱ्या एक 57 वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोर्टर चाळ विभाग प्रतिबंधित क्षेत्र, तर लगतची भाजी मंडई तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर हा बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित करोनाबाधित महिलेला बुधवारी (दि. 24) संध्याकाळी श्वसनाचा व इतर त्रास होऊ लागला. त्यामुळे या महिलेला तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी करोना तपासणीसाठी या महिलेचा स्वॅब घेण्यात आला.

आज, शुक्रवारी आलेल्या तपासणी अहवालात ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेला अगोदरपासूनच यकृताचा आजार आहे. सध्या या महिलेची प्रकृती अत्यवस्थ आहे.

दरम्यान, या महिलेच्या संपर्कात असलेल्या एकूण 7 जणांना कोविड केअर सेंटर, तळेगाव दाभाडे येथे क्वारंटाईन करण्यात आले असून, उद्या त्या सर्वांचे स्वॅब करोना चाचणीसाठी घेण्यात येणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.