Lonavala : ‘कोरोना’मुळे लोणावळ्यात गुन्ह्यांच्या संख्येत घट; केवळ संचारबंदी उल्लंघनचे 39 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन, संचारबंदी आणि जमावबंदी असल्याचे त्यांचे चांगले परिणाम गुन्हेगारी तसेच अपघात कमी होण्यावर झाले आहेत. लोणावळा शहरात 22 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान 42 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी संचारबंदीचे उल्लंघन करणारे कलम 188 प्रमाणे दाखल झालेले 39 गुन्हे असून इतर किरकोळ स्वरुपाचे केवळ तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

लाॅकडाऊन मुळे सर्व नागरिक आपआपल्या घरात असल्याने चोर्‍यांचे प्रमाण शंभर टक्के थांबले आहे. द्रुतगती आणि राष्ट्रीय मार्गावर वाहनांची संख्या तुरळक आल्याने अपघात घटले आहेत. फसवणूकीचे प्रकार, लूटमार, पाकिटमारी, खून, मारामारी हे प्रकार बंद झाले आहेत. कोरोनाची लागण झाल्याने रुग्णांची संख्या वाढत असली तरी लोणावळा शहरासह मावळ तालुक्यातील व एकंदरितच राज्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे.

लोणावळा शहरात मोठ्या प्रकारचे गुन्हे जास्त घडत नसले तरी किरकोळ वाद, अपघात, फसवणूक व चोर्‍यांचे गुन्हे जास्त दाखल होतात. मागील तिन महिन्यात शहरात 106 गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोना लाॅकडाऊनमुळे हे गुन्हे घटले असून केवळ किरकोळ स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे पोलीसांना जास्तीचा वेळ कोरोना बंदोबस्ताकरिता देता येऊ लागला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कोरोना आजाराचा प्रसार वाढण्यापूर्वी अपघातांची मोठी मालिका सुरु झाली होती. तीन दिवसात घाटात सात जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. तसेच 94 किमी अंतराच्या द्रुतगती मार्गावर खालापूर परिसर असो किंवा ओझर्डे अथवा किवळे अपघातांची मालिका सुरुच झाली होती.

लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे द्रुतगती मार्गावरील तसेच राष्ट्रीय मार्गावरील वाहतुक कमी झाल्याने अपघात देखिल बंद झाले आहेत. मागील पंधरा दिवसात कोणताही गंभिर स्वरुपाचा अपघात द्रुतगती मार्गावर झालेला नसल्याने कोरोनाचा हा चांगला फायदा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.