Lonavala Corona Update: ‘ग्रीन झोन’ लोणावळा-खंडाळ्यात सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

Lonavala Corona Update: First corona patient found in 'Green Zone' Lonavala-Khandala

एमपीसी न्यूज : सलग दोन दिवसांच्या ‘ब्रेक’नंतर आज (बुधवारी) मावळात कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला. खंडाळा येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. लोणावळा-खंडाळा परिसरातील हा पहिलाच रुग्ण असल्याने त्या भागात खळबळ उडाली आहे. एक नवीन रुग्ण वाढल्यामुळे तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे. 

गेल्या आठवड्यात सलग सहा दिवस मावळ तालुक्यात कोरोनाचे नवनवीन रुग्ण सापडत होते. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी तालुक्यात एकही नवीन रुग्ण न सापडल्याने मावळवासींना थोडा दिलासा मिळतोय असे वाटत असतानाच आज तिसऱ्या दिवशी मात्र खंडाळ्यात एका नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण 13 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या तालुक्यात 11 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

खंडाळा येथील एका 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या स्वॅबचा नमुना कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील आणखी नऊ जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले आहेत, असे त्यांनी सांगितले.

लोणावळ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना पुण्यात कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. काल त्यांचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. आज सायंकाळी त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने सदर व्यक्ती संपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील नऊ लोकांना तळेगाव येथील सुगी पश्चात केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये प‍ाठविण्यात आले आहे.

सदर कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण हे स्थानिक असून ते बाहेरून आलेले नाहीत अथवा बाहेर गेलेले नाहीत. त्यांच्या संपर्कात खंडाळा भागात कोणकोण आले आहे तसेच लोणावळ्यातील रुग्णालयात त्यांच्या संपर्कात कोणकोण आले होते याची तपासणी नगरपरिषद प्रशासनाने सुरू केली आहे.

खंडाळा कंटेनमेंट झोन

खंडाळा प्रभाग क्र. 9 मधील उत्तरेकडे विजय काळे दुकान ते पारशी सॅनिटोरियम, पुर्वेकडे विजय काळे दुकान ते सुधिर कुटे घर, दक्षिणेला सुधिर कुटे घर ते रहेजा बंगला, पश्चिमेकडे रहेजा बंगला ते पारशी सॅनिटोरियम हा भाग मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करून बंद केला आहे.

बफर झोन

उत्तरेकडे केळपेठपासून निळकंठेश्वर मंदिर व सर्वोदय नर्सरीपर्यतचा भाग, पुर्वेकडे जिल्हा परिषद दवाखाना परिसर, रोहिदासवाडा ते आयसीआयसीआय बॅक पर्यत, दक्षिणेकडे खंडाळा रेल्वे स्टेशन ते खंडाळा स्मशानभुमी समोरिल रेल्वेचा बोगदा, पश्चिमेकडे रहेजा बंगल्यापासून जुना खंडाळा हाॅटल व हिलटाॅपचा पुर्वेकडील भाग जुन्या हायवेपर्यत.

मागील 17 दिवसात मावळ तालुक्यातील शहरी भागात 4, तर ग्रामीण भागात 9 अशा एकूण 13 जणांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना एक छोटेसे ‘ब्रेक’ के बाद…

7 मे रोजी तळेगावात पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यापाठोपाठ 11 मे रोजी माळवाडी येथे आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. सुदैवाने या दोन्ही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानंतर 19 मे अहिरवडे, 20 मेला नागाथली, 21 मे रोजी वेहेरगाव व चांदखेड या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक, तर 22 मेला तळेगाव, 23 मे पुन्हा चांदखेड येथे 4 रूग्ण आणि रविवार, दि 24 मे रोजी घोणशेत येथे एक कोरोना रूग्ण सापडला होता. सोमवार व मंगळवारच्या ‘ब्रेक’नंतर बुधवारी पुन्हा कोरोनाने मावळात डोके वर काढले आहे.

आजपर्यंत चांदखेड वगळता इतर सर्व रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील सर्व व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, घोणशेत येथील 9 व्यक्तींचे स्वॅब टेस्टसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा चाचणी अहवाल मंगळवार (दि 26) रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.