Lonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊनच्या सहा महिन्याच्या काळात संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 827 जणांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले तर दारुबंदीचे 29 व जुगारीचे 5 खटले दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 3266 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आला होता. लाॅकडाऊन काळात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली होती. असे असताना देखील बिनधास्तपणे फिरणार्‍या 827 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले.

तर कार्ला, मळवली, वेहेरगाव, कुसगाव, ओळकाईवाडी व पवनानगर परिसरात 29 ठिकाणी दारुबंदीची कारवाई करत 18 लाख 18 हजार 418 रुपयांचा माल जप्त केला. पाच ठिकाणी जुगार अड्ड्यांवर कारवाई करत 1 लाख 3 हजार 191 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

अनलाॅकच्या प्रक्रियेत पर्यटनबंदी असताना देखील लोणावळा ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी गर्दी करणारे, मास्क परिधान न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन, वाहतूक नियमांचा भंग आदी प्रकारच्या 2250 कारवाया करत 4 लाख 62 हजार 700 रुपयांचा दंड ग्रामीण पोलिसांनी तर 1016 जणांकडून 3 लाख 56 हजार 300 रुपयांचा दंड ग्रामपंचायतींनी वसूल केला असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

पुणे ग्रामीणचे तत्कालिन पोलीस अधिक्षक संदीप पाटील, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणावरे यांच्या पथकांनी वरसोली टोलनाका, मळवली, कार्ला फाटा, दुधीवरे खिंड, पवनानगर परिसरात ही कारवाई केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.