Lonavala : विनाकारण दोघांवर वार; आरोपी फरार

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या दोघांवर अचानक आलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने वार केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री साडेनऊच्या सुमारास कुसगाव भैरवनाथ नगर मधील अंगणवाडी शाळेजवळ घडली.

निखिल अनिल मोरे (वय 25, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राकेश दशरथ कालेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आचारी म्हणून काम करतो. तो त्याच्या एका मित्रासोबत रात्री साडेनऊच्या सुमारास भैरवनाथ नगर मधील अंगणवाडी शाळेसमोरून जात होता. त्यावेळी राकेश हातात धारदार शस्त्र घेऊन आला. त्याने अनिलला शिवीगाळ करत डाव्या हाताच्या मनगटावर वार केले. हे भांडण सोडविण्यासाठी अनिलचा मित्र धावला. यामुळे राकेश याने मित्राच्या डाव्या खांद्यावर आणि पोटरीवर वार केले. यामध्ये दोघेही जखमी झाले. दरम्यान राकेश घटनास्थळावरून पळून गेला. अनिल आणि राकेश यांच्यामध्ये कोणतेही भांडण नव्हते, हा संपूर्ण प्रकार विनाकारण झाला असून यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.