Lonavala Crime News : अपघाताचा बनाव करून खून करणारा आरोपी एका तासात लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – अपघाताचा बनाव करून एकाचा खून करून पळालेल्या इसमाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एक तासाच्या आत सापळा लावत अटक केली. आज शुक्रवारी (19 मार्च) रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रामदास भिमराव ओझरकर (रा. ओझर्डे, पवनानगर, ता. मावळ) असे या आरोपीचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर ग्रामीणचे पथक तात्काळ धाव घेऊन घटनास्थळी पोहचले.

तेथे पाहणी केली असता सदर ठिकाणी एक इसम निपचित पडलेला दिसला, तेव्हा सदर अपघात बाबत संशय आल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता एका इसमाने पाठीमागून धडक देऊन तो इसम त्याची चारचाकी गाडी घेऊन लोणावळ्याच्या दिशेला गेल्याची माहिती समजली.

या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नाकाबंदीमध्ये रामदास भिमराव ओझरकर याची गाडी समोरून धडकले दिसून आल्याने सदर गाडी थांबवून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली.

भाजे गावच्या हद्दीतून एक्सप्रेस वे वरून यातील मयत सतीश ओझरकर हा त्याच्या मोटरसायकलवर लोणावळा च्या दिशेने जात असताना रामदास ओझरकर याने जुन्या भांडणाचे कारणावरून सतीशच्या दुचाकीला मारुती सुझुकी 800 या गाडीने पाठीमागून जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक दिली. तेव्हा मृत हा खाली पडल्यावर त्याने गाडीतून खाली उतरून त्याचे हातातील लोखंडी रॉडने सतीश ओझरकर याचे डोक्यात, अंगावरती मारून त्यास जीवे ठार मारले असल्याचे सांगितले.

आरोपी रामदास व मृत सतीश ओझरकर यांच्यात काल गावात भांडणं झाली होती. या भांडणांतून रामदासने सतीशच्या अपघाताचा बनाव बनवून त्याला मारण्याचा प्लॅन केल्याची कबुली दिली असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत काँवत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, स.पो.उ.नि. शिंदे, पोलीस हवलदार युवराज बनसोडे, शकील शेख, पोलीस नाईक देविदास चाकणे, मयुर अबनावे, पोलीस शिपाई हणमंत शिंदे, ऋषिकेश पंचरास, स्वप्नील पाटील, शिधेश्वर शिंदे, मच्छिंद्र पानसरे यांच्या पथकाने एक तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेत अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.