Lonavala Crime News : जुगार अड्ड्याचा पर्दाफाश; 72 जणांवर गुन्हा दाखल

44 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : लोणावळ्यातील कुमार रिसाॅर्ट या नामांकित हाॅटेलात रंगलेल्या जुगारावर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकत 72 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 44 लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

जुगार खेळण्यासाठी आलेले सर्व जण हे गुजरात राज्यातील व्यापारी असून खास जुगार खेळण्यासाठी लोणावळ्यात आले होते.

लोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कुमार रिसाॅर्टमध्ये जुगार खेळ सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांना मिळाल्यानंतर रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काँवत यांच्यासह लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, पल्लवी वाघोले, अश्विनी लोखंडे, विकास कदम, शंकर धनगर, सागर धनवे, ईश्वर काळे, सतिष कुदळे यांच्या पथकाने छापा मारत ही कारवाई केली.

यामध्ये गुजरात येथील 60 व्यापार्‍यांसह सर्व्हिस प्रोव्हाईड करणार्‍या 12 महिला तसेच कुमार रिसाॅर्टचे मालक धिरजलाल कुमार ऐलानी, कुमार रिसाॅर्टच्या व्यवस्थापक अन्वर शेख (दोघेही रा. मुंबई), जुगारीचे नियोजन करणारा झिशान इरफान ईलेक्ट्रिकवाला (वय 34, रा. जोगेश्वर वेस्ट मुंबई) यांच्यावर पोलीस काँन्स्टेबल विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवी कलम 188, 269 यासह दारुबंदी कायदा कलम 86 (1), जुगार प्रतिबंध अधिनियम 4 व 5 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या धाडीत पोलीसांनी खेळात वापरलेली 3 लाख 20 हजार 830 रुपयांची रोकड, 6 हजार 343 रुपयांची दारू, खेळासाठी वापरण्यात येणारे 1000 रुपये किंमतीचे 36 लाख 60 हजार रुपयांचे टोकन व 500 रुपये किंमतीचे 4 लाख 75 हजार रुपयांचे टोकन जप्त केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.