Lonavala Crime News : लोणावळ्यात डॉक्टरच्या बंगल्यावर पडलेल्या धाडसी दरोड्यातील आठ आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – लोणावळ्यात जून महिन्यात डॉक्टर खंडेलवाल यांच्या बंगल्यावर धाडसी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी बंगल्यातील हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला बांधून ठेवून तब्बल 66 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणातील आणखी 8 आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील सात आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

हेमंत रंगराज कुशवाह, नथु साधू विश्वासराव, सुनील शंकर शेजवळ, रविंद्र काशिराम पवार, श्याम सुंदर शिवनाथ शर्मा, मुकेश रमेश राठोड, सागर रमेश धोत्रे, प्रशांत उर्फ हेमंत रंगराज कुशवाह उर्फ पटेल, दिनेश जयराम अहिरे, शंकर गुरव, संजय भगवान शेंडगे, दौलत भावसिंग पाटील, विजय चंद्रप्रकाश पटेल, गोविंद थानसिंग कुशवाह आणि प्रदीप लल्लु धानुक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 17 जून चा रात्री डॉक्टर हिरालाल खंडेलवाल (वय 73) हे पत्नीसह राहत्या घरात झोपले होते. यावेळी आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास खिडकीतुन बंगल्यात प्रवेश केला आणि खंडेलवाल पती-पत्नींना दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 66 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. लोणावळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. यातील प्रमुख आरोपी हे मध्यप्रदेशात असल्याचे समजल्यानंतर तीन आठवडे त्यांनी मध्य प्रदेशात तळ ठोकला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातुन पाच मुख्य आरोपी आणि दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 30 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणावळा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.