Lonavala Crime News : मांत्रिकाकडून उपचार करून घेताना गर्भवती महिलेचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गर्भवती महिलेला त्रास जाणवत असताना तिच्यावर वैद्यकीय उपचार न करता तिला मांत्रिकाकडे घेऊन जात अघोरी उपचार करत तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील शिळीम या गावात ही घटना घडली. बऊर येथे राहणार्‍या दिपाली नावाच्या युवतीचा शिळिंब येथील महेश रघुनाथ बिडकर यांच्याशी मागील 11 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सासरचे लोक दीपालीला अनेक कारणावरून नेहमीच त्रास देत असत असे तिच्या भावाने तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यातच दिपाली ही आठ महिन्याची गरोदर असताना तिला त्रास जाणवू लागल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार न करता तीला बाहेरील बाधा झाली आहे असे सांगत गावातील एका मांत्रिक बाईकडे सासरच्या मंडळींनी तिच्यावर आघोरी उपचार करत उतारे टाकण्यात आले.

त्यामुळे दीपालीला अधिकचा त्रास असह्य होऊ लागला संबंधित बाब ही दीपालीच्या सासरकडील मंडळींनी दीपालीच्या माहेरच्यांना कळविले त्यानुसार दीपालीच्या पालकांनी विनवणी केल्यानंतर तिला तळेगाव जनरल येथील रुग्णालयात 10 फेब्रुवारी 2021 रोजी दाखल करण्यात आले परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने दिपालीचा उपचारादरम्यान रुग्णालयात दुदैवी मृत्यू झाला.

या घटनेसंबंधी दीपालीच्या पालकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे यांच्याकडे दाद मागितल्यानंतर अंनिसच्या नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, पांडूरंग तिखे आदींनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सदरचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. यानुसार दीपालीचा पती महेश रघुनाथ बिडकर यांच्यासह रघुनाथ बिडकर, जिजाबाई बिडकर, मोहन बिडकर, बकुळा मोहन बिडकर व मांत्रिक महिला यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दीपालीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून फरार आरोपींचा शोध लोणावळा ग्रामीणचे पोलीस घेत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.