Lonavala crime News : आईस्क्रीम डिस्ट्रिब्युटरकडून दोन पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील एका आईस्क्रीम डिस्ट्रिब्युटरकडून जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन पिस्टल, एक जिवंत काडतूस, कोयता आणि रँबो चाकू अशी घातक शस्त्रे जप्त केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सूरज विजय अगरवाल (वय 40, रा. कल्पतरू हास्पिटलच्या समोर, वर्धमान सोसायटी, लोणावळा, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना माहिती मिळाली की, लोणावळा येथे कल्पतरू हास्पिटलच्या समोर गुरुकृपा डिस्ट्रिब्युशन आईस्क्रीम डिस्ट्रिब्युटरचे दुकान आहे. या दुकानदाराकडे दोन पिस्टल आहेत.

या माहितीनुसार, पोलिसांनी गुरुकृपा डिस्ट्रिब्युशन येथून सुरज याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळाले.

त्याच्या दुकानात तपासणी केली असता आणखी एक पिस्टल, कोयता आणि रँबो चाकू असा शस्त्रसाठा मिळून आला. पोलिसांनी एक लाख 900 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. सुरज याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला पुढील कारवाईसाठी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस कर्मचारी सुनील जावळे, प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, लियाकत मुजावर, सुधीर अहिवळे, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.