Lonavala : मावळ तालुक्यात सर्वत्र दत्त जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरासह मावळ तालुक्यात सर्वत्र श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. अनेक गावांमध्ये दत्त जयंतीची धामधूम पहायला मिळाली.

दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरासह विविध ठिकाणी रिक्षा स्टँड, पोलीस स्थानक व घरोघरी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री सदगुरु सेवा मंडळ तळेगावच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त गुरु पादुका अभिषेक, संकल्प, सत्यदत्त पूजा, नवग्रह व नक्षत्र पूजन, अग्नी आवाहन, होम संकल्प, हवन, वैयक्तिक हवन, भक्ती संगीत नादस्वर यांचा गायनाचा कार्यक्रम, विश्वकल्याण व विश्वशांती संकल्प प्रार्थना, श्री दत्त जन्मोत्सव, महाप्रसादाचे आयोजन केले होते.

_MPC_DIR_MPU_II

कुसगाव दत्तवाडी येथे श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मोठमोठे पाळणे याठिकाणी दाखल झाल्याने बालचमूंसह मोठ्यांनी यात्रेचा आनंद घेतला. भाजे गावात देखील दत्त जयंतीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दत्तवाडी व भाजे गावात धार्मिक कार्यक्रमासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात दत्त जयंती उत्सव साजरा केला. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. यासह जयचंद चौकातील रिक्षा स्टँड, नांगरगाव दत्त मंदिर, कुरवंडे, खंडाळा, भांगरवाडी, तुंगार्ली, वरसोली, वाकसई, मळवली, सदापुर, कार्ला, वेहेरगाव, कामशेत, वडगाव मावळ, पवनानगर, देहू, देहूरोड या सर्वच भागात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

दत्त महाराजांचे भजन व संगीत सोहळ्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या भक्तीमय व आनंदमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.