Lonavala : डेला अँडव्हेंचर ट्रेनिंग अकादमी पर्यटकांना देतेय स्वसंरक्षणाचे धडे

एमपीसी न्यूज- आजकाल दहशतवादी हल्ले कधी आणि कुठे होतील याचा काही नेम नाही. त्यामुळे कायम सतर्क राहणे ही काळाचीच गरज आहे. केवळ असे हल्लेच नव्हे तर अनेकदा नैसर्गिक पूर, आगीच्या घटना अशा आकस्मिक संकटाशी सामना करण्याचीही वेळ येते. अशा प्रसंगी घाबरून न जाता स्वत:चा आणि इतरांचा बचाव कसा करायचा याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण प्रत्येकालाच मिळायला हवे, हीच गरज ओळखून डेला समूहाचे प्रमुख जिमी मिस्त्री यांनी राजमाची किल्ल्याजवळ  उदेवाडी येथे शिरोता धरणाच्या काठावर तीन एकराच्या परिसरात या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारा  देशातील हा पहिलाच उपक्रम आहे. 

पंचतारांकित रिसॉर्टच्या वातावरणात त्याची सांगड घातल्याने पर्यटकांसाठी ही आगळी वेगळी संधी आहे. रिसॉर्ट , व्हिलाज आणि अँडव्हेंचर पार्कच्या क्षेत्रामध्ये आपले पाय घट्ट रोवलेल्या या उद्योगाने ही अकॅडमी स्थापन करून राष्ट्रप्रेमाचे एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

26/11 ला मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराध लोक शहीद झाले. त्यामुळे व्यथित झालेले जिमी मिस्त्री यांनी या घटनेचा सामना कसा करावा याचे प्रशिक्षण नागरिकांना देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. हा तरुण उद्योजक स्वत: प्रखर राष्ट्रभक्त असून प्रत्येकामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

येथील प्रशिक्षण अधिक परिणामकारक आणि शास्त्रशुद्ध होण्याचे मुख्य कारण म्हणजे इथे उभी केलेली लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांची भक्कम फळी. लष्कराच्या सदर्न कमांडचे माजी प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल रेमंड नऱ्होना यांच्या नेतृत्त्वाखाली जवानांची तरूण तुकडी येथे प्रशिक्षण देते. प्रत्यक्ष दहशतवाद्यांचा खात्मा करणारे ब्लॅक कॅट कमांडो देखील या तुकडीत आहेत.

दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी वा अन्य काही कारणाने उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत संकटाला घाबरून न जाता त्यातून आपला बचाव कसा करायचा याचे तंत्र येथे शिकविले जाते. तोल सांभाळत पाईपवरून चालणे, भिंत ओलांडणे, क्रॉलिंग करत पुढे सरकने, दोरीवर चढणे, दोरीच्या सहाय्याने तयार केलेला पूल ओलाडणे, आगीतून चालणे असे 19 प्रकारचे अडथळे पार करण्याचे प्रशिक्षण येथे दिले जाते. त्याचप्रमाणे अतिरेक्याकडून अचानक गोळीबार झाल्यास गर्भगळित न होता स्वत:चा बचाव कसा करावा याचे तंत्रही येथे शिकविण्यात येते.

या सर्वांचे प्रशिक्षण देण्यासाठी एक ते दोन दिवस कालावधीचे विविध  कार्यक्रम येथे राबविण्यात येतात. त्यात दहशतवादी हल्ल्यापासूश बचावाचे प्रशिक्षण, आपत्कालिन परिस्थितीतून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करणे तसेच प्रतिकूल परिस्थितीत जंगलातही आपला निभाव कसा लागेल या दृष्टिने सज्ज करणे अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यासाठी येथे रात्रीच्या वेळी जंगलातून भ्रमंती करण्याचा अनुभव पर्यटकांना दिला जातो.

प्रत्येक व्यक्तीमध्ये एक देशभक्त सैनिक दडलेला असतो, ही भावना जागी व्हावी म्हणून येथे आवर्जून प्रत्येकाला लष्करी गणवेश दिला जातो. त्यामुळे जवानाच्या खडतर आयुष्याची कल्पना येते.

जिमी मिस्री यांची ही कल्पना आता हळूहळू लोकप्रिय होऊ लागली असून डेला रिसॉर्टला येणारे अनेक पर्यटक  डेटालाही भेट देत आहेत. डेटाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात लहान मुले, कुटुंब आणि वेगवेगळ्या कंपन्यांमधील अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. युद्धभूमीवर लढाईसाठी  कराव्या लागणाऱ्या नियोजनातून कार्पोरेट जगतालाही काही धडे घेता येतात त्यामुळे कार्पोरेट जगताला डेटातील प्रशिक्षणाचे विशेष आकर्षण आहे. गुगल सारख्या अनेक मोठ्या कंपनीतील अधिकाऱ्यांनी नुकतेच येथे प्रशिक्षण घेतले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात विश्रांती बरोबरच लष्करी जीवन अनुभवण्याच्या या संधीचा लाभ प्रत्येकाने आवर्जून घ्यायला हवा.

या अकॅडमीला अनेक नामवंतांनी भेट देऊन तिची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.त्यात प्रामुख्याने सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, माधुरी दीक्षित, आदित्य ठाकरे, विश्र्वास नांगरे पाटील आदींचा समावेश आहे.

दहशतवादाचा बदला

“डाटाची स्वप्नात असलेली माझी संकल्पना प्रत्यक्षात आली याचा मला विशेष आनंद आहे.कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत त्या प्रसंगाला धिराने तोंड देण्यासाठी व त्यातून आपला व इतरांचा बचाव करण्यासाठी प्रत्येक पुरूष, महिला आणि मुलांना प्रशिक्षित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भारतीय सेना दलातील दहशतवादी विरोधी लढ्यात जिवाची बाजी लावणारे जवान, अधिकारी आणि ब्लॅक कॅट कमांडो यांना येथे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.ज्या निरपराधांना आपला जीव दहशतवादी हल्ल्यात गमवावा लागला, त्या प्रत्येकाला डाटा मी समर्पित करीत आहे. डाटाच्या निमित्ताने आम्ही लष्करी संकल्पनेवर आधारित पर्यटनाचा नवा पायंडा निर्माण केला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.