Lonavala : अवजड वाहनांची वाहतूक द्रुतगती मार्गावर वळविण्याची मागणी

लोणावळा शहरातील वाहतूक बंद करा

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्याकरिता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा व खंडाळा शहरातून वळविण्यात आलेली अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा, अशी मागणी नगरसेवक व युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष निखिल कवीश्वर यांनी केली आहे.

अमृतांजन पूल पाडण्याकरिता व रस्ता रुंदीकरण कामाकरिता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुक दहा दिवसांकरिता बंद करण्यात आली होती. प्रत्यक्षात महिनाभराचा कालावधी लोटला तरी ही वाहतूक लोणावळा आणि खंडाळा शहरातूनच सुरु आहे.

पंधरा दिवसापुर्वी खंडाळ्यात एका लहान मुलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर अपघात देखिल झाला आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे लोणावळा व खंडाळा शहरात वाहतुककोंडी होत आहे. तसेच हे वाहनचालक खरेदीकरिता दुकानांमध्ये थांबत असल्याने त्यांच्या माध्यमातून लोणावळा शहरात कोरोनाचा संसर्ग होण्याची देखिल दाट शक्यता आहे.

मागील दोन दिवसात अत्यावश्यक सेवेच्या वाहनांमधून प्रवास करणार्‍या काही जणांना खुद्द नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनीच पकडले आहे. लोणावळा शहर हे आजपर्यत कोरोनामुक्त राहिले आहे. असे असताना अत्यावश्यक सेवेच्या वाहनांमधून तसेच प्रवासी पास घेऊन लोणावळा शहरात येणार्‍या नागरिकांपासून शहराला धोका संभावू शकत असल्याने तात्काळ शहरातून सुरू असलेली वाहतूक बंद करावी अशी मागणी कविश्वर यांनी केली आहे.

लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जीवन गायकवाड यांनी देखिल याबाबत प्रशासनाला मागील आठवड्यात पत्र दिले आहे. द्रुतगती मार्गाची पाहणी केली असता वाहतुकीकरिता दुतर्फा दोन लेन सुरू करण्याजोगी परिस्थिती असताना रस्ते विकास महामंडळ शहरवासीयांच्या जीवाशी खेळत आहे असे कविश्वर यांनी सांगितले.

अवजड वाहनांची वाहतूक वेगात होत असल्याने काही अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोणावळा नगरपरिषदेने देखिल रस्ते विकास महामंडळाला यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा असे पत्र दिले आहे.

अमृतांजन पूल पाडल्यानंतर खंडाळा घाटात रस्ता रूंद झालेला असताना देखिल मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like