Lonavala : कार्ला लेणी व एकविरा मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍यांची दुरवस्था

एमपीसी न्यूज- लेणी समुहातील कोरीव कामाचा उत्कृष्ट अविष्कार असलेली कार्ला लेणी तसेच महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कुलस्वामींनी आई एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणार्‍या गडावरील पायर्‍यांची अतिशय दैनावस्था झाली असून गडावर चढताना व उतरताना भाविक व पर्यटकांना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी देवीच्या उत्सवाच्या दृष्टीने या पायऱ्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील नागरिक व भाविकांनी केली आहे.

येत्या 29 सप्टेंबर पासून देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक ध्यानात घेता महिला मतदारांना देवीचे दर्शन घडविण्याकरिता याठिकाणी सहली येण्याची दाट शक्यता असल्याने या सर्वाना तुटलेल्या व भराव खचल्याने ढासळलेल्या पायर्‍यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. भारतीय पुरातत्व विभाग व एकविरा देवी मंदिरावर नियुक्त शासकीय समितीने याची गांभीर्याने दखल घेत तातडीने पायर्‍यांची डागडुजी व नूतनीकरण करण्याची गरज आहे.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले एकविरा देवीचे मंदिर व शिल्पशृंखलेतील उत्कृष्ट कोरीव काम असलेली कार्ला लेणी व परिसर कायमच विकासापासून दुलर्क्षित राहिला आहे. एकविरा देवस्थान, वनविभाग व भारतीय पुरातत्व विभाग या तीन विभागाच्या अखत्यारित हा परिसर असल्याने विकासकामांना खिळ बसली आहे. गडावरील सुरक्षा भित कोसळली असून काही भाग धोकादायक झाल्याने दर्शन रांगेलगतचा काही भाग देखील बंद करण्यात आला आहे. अंधारी गुफेकडे जाणारी शिडी तुटलेली असल्याने तब्बल पंधरा वर्षापेक्षा अधिक काळापासून ही गुहा पर्यटकांना पाहता येत नाही.

गडपायथा ते पाच पायरी मंदिर व पाच पायरी मंदिर ते गडादरम्यान अनेक ठिकाणी पायर्‍यांचा भराव खचला आहे. काही ठिकाणी पायर्‍यांचे दगड गायब झाले आहेत. खड्डे पडले आहेत. गडाच्या शेवटच्या टप्प्यात भराव ढासळल्याने पायर्‍या पडल्या असून जेमतेम एक व्यक्ती जाऊ शकेल एवढीच जागा शिल्लक असल्याने गर्दीच्या काळात याठिकाणी हमखास अपघात होण्याची शक्यता आहे. वडगाव न्यायालयाच्या न्यायाधीश, मावळचे तहसीलदार व सह धर्मदाय आयुक्त हे येथील देवस्थान समितीचे प्रमुख असल्याने त्यांनी तातडीने सदर पायर्‍या दुरुस्तीचे आदेश पुरातत्व विभागाला द्यावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.