Lonavala : भाजपा शहर‍ाध्यक्ष बाबा शेट्टी यांचे पक्षातून निलंबन करा

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

एमपीसी न्यूज- शिस्तप्रिय पक्ष असलेल्या भाजपा पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष बाबा शेट्टी यांचे पक्षातून निलंबन करावे अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्याकडे केली आहे.

मागील आठवड्यात भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे पदाधिक‍ारी, बुथ कमिटी सदस्य व पदाधिकारी असे 180 जणांनी पक्षाच्या पदांचे राजीनामे दिले असल्याचे पत्रक प्रसिध्दीला दिले होते. त्यांचे हे पत्रक वास्तवाशी धरुन नाही. लोणावळा शहर नव्हे तर मावळ तालुक्यात देखील भाजपाचे 180 पदाधिकारी नसताना त्यांनी खोटी माहिती प्रसिध्दीला देत पक्षाची प्रतिमा मलिन केली असल्याचा आरोप नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केला आहे. बाबा शेट्टी यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली आहे.

ज्या स्विकृत सदस्यपदावरुन लोणावळा शहर भाजपात हा वाद सुरु आहे त्यावर बोलताना पुजारी म्हणाले, ” स्विकृत सदस्य बदलाबाबत कोणताही फाॅम्युला ठरलेला नाही. लोणावळा शहरात पक्षाचे काम समाधानकारक सुरु असताना पक्षातील काही लोकांना फितवुन पक्षांची प्रतिमा मलिन करण्याचे काम शेट्टी करत आहेत. तसेच स्विकृत सदस्य जाधव यांनी नगरपरिषदेच्या विविध ठिकाणांच्या जागांच्या मोजणीबाबत मोठं काम केले आहे. मागील 25 वर्षात जी कामे झाली नाहीत ती बाळासाहेब जाधव यांनी केली असल्याचे सांगत यापुढील काळात देखील जाधव हेच पक्षाचे नगरसेवक असतील असे पुजारी यांनी सांगितले.

भाजपाच्या कामगिरीवर काँग्रेस समाधानी

लोणावळा शहरात भाजपा व काँग्रेस या पक्षांची आघाडी आहे. उपनगराध्यक्ष पद देखील भाजपा, काँग्रेस व आरपीआय यांना विभागून देण्याचा विषय होता मात्र मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष आमच्या कामावर समाधानी असल्याने त्यांनी आमच्याकडे राजीनाम्याबाबत कोणतीही मागणी केलेली नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.