Lonavala : नगरपालिका कर्मचाऱ्यास मारहाण करणार्‍या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे निलंबन करा

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यास दारुच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांचे तातडीने निलंबन करा अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व शिष्टमंडळाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोणावळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी गेनू मानकू बोडके (वय 54) हे जुना खंडाळा येथील अशोक निर्वाण समोर रविवारी दुपारी पाणीपुरवठ्याची लाईन लिकेज काढण्याचे काम करत असताना त्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आलेले पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी ‘हे काय चालले आहे?’ असे विचारत बोडके यांना काही बोलू न देता धक्काबुक्की करून कानशिलात लगावली.

यावेळी बोडके यांनी ‘साहेब माझी काय चुकी आहे?’ असे विचारले असता पुन्हा त्यांच्या अंगावर धाऊन जात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांना पुन्हा मारहाण केली तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावेळी धावून आलेले अशोक निर्वाणचे वॉचमन देशपांडे यांना देखील मारहाण करण्यात आली. शिवथरे हे कायमच शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांना त्रास देत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवथरे यांच्या या कृतीचा नगरपरिषदेतील नगरसेवक, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक व नगराध्यक्ष यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मोर्चा नेऊन घटनेचा निषेध नोंदविला. शिवथरे यांचे तातडीने निलंबन न झाल्यास लोणावळा शहर बंद करून पोलीस प्रशासनाच्या विरोधात लोणावळेकर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, विजय सिनकर यांनी शहरवासीयांच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना दिला आहे.

दरम्यान ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या बाबत यापुर्वी देखील तक्रारी आल्या असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. तसेच काल लोणावळ्यात घडलेल्या प्रकरणाची योग्य चौकशी करुन अहवाल कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पाठवून तीन ते चार दिवसात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी नगराध्यक्षा व शिष्टमंडळाला दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.