Lonavala : कार्ला गडावरील एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द; रिती रिवाजाप्रमाणे होणार धार्मिक विधी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रसिध्द देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी श्री एकविरा देवीची आज मंगळवार (दि.31) रोजी चैत्र सप्तमीला होणारी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली आहे. पहाटे व सायंकाळी केवळ रिती रिवाजाप्रमाणे धार्मिक विधी केले जाणार आहे, अशी माहिती देवस्थान प्रशासकिय समितीच्या वतीने देण्यात आली.

महाराष्ट्रातील तमाम कोळी आग्री समाजाची कुलस्वामींनी असलेल्या श्री एकविरा देवीच्या यात्रा दरवर्षी कार्ला गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडते. षष्टीच्या दिवशी देवघर या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथाचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा, सप्तमीला कार्ला गडावर सायंकाळी सात वाजता वाद्यांच्या गजरात देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा व अष्टमीच्या पहाटे देवीचे तेलवन व मानाचा सोहळा पार पडतो.

यात्रेच्या महिनाभर आदीपासून जिल्हा व तालुका प्रशासन तसेच वेहेरगाव ग्रामपंचायत, देवस्थान समिती तयारी करत असते, येणार्‍या भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता 24 तास देवालय सुरु ठेवण्यात येते. महाराष्ट्रातील कोळी, आग्री, सिकेपी, सोनार समाज मोठ्या श्रध्देने गडावर विविध गावांमधून पालख्या घेऊन गडावर येतो.

यावर्षी मात्र कोरोना या महामारीच्या आजाराचे संकट सर्व देशवासीयांच्या डोक्यावर थैमान घालत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा विचार करता गडावरील यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे समितीचे सचिव व मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे, समितीचे अध्यक्ष व न्यायाधिक मुळीक यांनी सांगितले. ग्रामस्तांसह कोणीही गडावर येणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून पुजारी व गुरव हेच देवीचे धार्मिक विधी करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.