Lonavala News : व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध न झाल्यास सोमवारपासून उपोषण

नगरसेवक निखिल कविश्वर यांचा प्रशासनाला इशारा : Fasting from Monday if ventilator bed facility is not available

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि लोणावळा शहरातील लोकसंख्या तसेच येथील वाढती रुग्णसंख्या बघता याठिकाणी रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेडची सुविधा गरजेची आहे. त्यासाठी येत्या सोमवारपर्यंत व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी दिला आहे.

लोणावळा शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी आँक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने शहरातील रुग्णांना तळेगाव येथे जावे लागते.

तेथेही अनेकदा बेड उपलब्ध होत नाही, बेड उपलब्ध झाले तरी आवश्यक औषध, इंजेक्शन त्याठिकाणी मिळत नसल्याने रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत आहेत.

लोणावळा शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या ही एक लाखाहून अधिक आहे. त्यामुळे लोणावळा शहरात कोविड केअर सेंटर मध्ये व्हेंटिलेटर सुविधा असणे अत्यावश्यक आहे.

नगरपरिषदेने जिल्हाधिकारी व पुणे जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडून व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता याठिकाणी करून घ्यावी; अन्यथा येत्या सोमवारनंतर उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेवक कवीश्वर यांनी लोणावळा प्रशासनाला दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.